हजाराहून अधिक इमारती जळून खाक
वृत्तसंस्था/ होनोलुलु
अमेरिकेच्या हवाई प्रांतातील जंगलांमध्ये लागलेल्या आगीमुळे आतापर्यंत 53 जणांचा मृत्यू झाला आहे. हवाईमधील ही आतापर्यंतची सर्वात भीषण आपत्ती ठरली आहे. या आगीत सुमारे एक हजार इमारतीन जळून खाक झाल्या आहेत. तर अनेक जण बेघर झाले आहेत. या आगीत अमेरिकेतील सर्वात मोठा वृक्षही जळाला आहे.
हवाईच्या पश्चिम किनाऱ्यावर माउई बेटामध्ये ही आग जोरदार वाऱ्यामुळे फैलावली आहे. आग वेगाने फैलावल्याने अनेक लोकांना बचावाची संधीच मिळाली नाही. काही लोकांनी स्वत:चा जीव वाचविण्यासाठी समुद्रात उडी घेतली. माउई येथून आतापर्यंत हजारो लोकांना सुरक्षित बाहेर काढण्यात आले आहे. अद्याप 1400 लोक तेथून बाहेर पडण्यासाठी विमानतळावर प्रतीक्षा करत आहेत. यातील बहुतेक जण हे पर्यटक आहेत.

लहायना शहरात झालेल्या नुकसानीनंतर ते पुन्हा उभे करण्यासाठी अनेक वर्षे अन् अब्जावधी रुपये लागणार आहेत. 1961 मध्ये एका सागरी लाटेत 61 लोकांचा मृत्यू झाल्यावर ही आतापर्यंतची सर्वात मोठी दुर्घटना असल्याचे उद्गार हवाईचे गव्हर्नर जॉश ग्रीन यांनी काढले आहेत. तर अध्यक्ष जो बिडेन यांनी वणव्याला आपत्ती घोषित करत मदतकार्यांसाठी निधी जारी केला आहे.
जीव वाचविण्याच्या प्रयत्नात 100 हून अधिक जणांनी समुद्रात उडी घेतल्याचा संशय आहे. आगीमुळे पसरलेल्या धूरामुळे हेलिकॉप्टर्सच्या उ•ाणांना अडथळे निर्माण होत आहेत. तरीही तटरक्षक दलाने 50 हून अधिक लोकांना वाचविल्याची माहिती अमेरिकेच्या तटरक्षक दलाचे कमांडर एजा किरक्सके यांनी दिली आहे.









