प्रतिनिधी / बेळगाव
हिंडलगा मध्यवर्ती कारागृहातील एका कैद्याने आपल्याच कोठडीतील दुसऱ्या एका कच्च्या कैद्यावर स्क्रू ड्रायव्हरने जीवघेणा हल्ला केला होता. याप्रकरणी दोघा जणांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. कारागृह विभागाचे डीआयजी टी. पी. शेष यांनी स्वत: याप्रकरणाची चौकशी केली होती. अधिकाऱ्यांवरील निलंबनाच्या कारवाईने कारागृहात खळबळ माजली आहे.
कारागृहाचे मुख्य वॉर्डन बी. एन. मेळवंकी व वॉर्डन व्ही. टी. वाघमोरे यांना निलंबित करण्यात आले आहे. कारागृहाचे मुख्य अधीक्षक कृष्णकुमार यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी कारवाईच्या वृत्ताला दुजोरा दिला. कैद्यांमधील हाणामारी प्रकरणी ही कारवाई करण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले.
29 जुलै रोजी दुपारी सुरेश ऊर्फ साईकुमार या कच्च्या कैद्यावर त्याच कोठडीमधील शंकऱ्याप्पा बजंत्री या कैद्याने स्क्रू ड्रायव्हरने हल्ला केला होता. जखमी सुरेश ऊर्फ साईकुमारवर उपचार करण्यात येत आहेत. याप्रकरणी बेळगाव ग्रामीण पोलीस स्थानकात शंकऱ्याप्पावर एफआयआरही दाखल करण्यात आला आहे. या घटनेनंतर कारागृह विभागाचे डीआयजी टी. पी. शेष यांनी कारागृहाला भेट देऊन संपूर्ण प्रकरणाची चौकशी केली होती. त्यानंतर दोघा जणांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. हल्ल्याच्या या घटनेनंतर कारागृहातील आणखी एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. याप्रकरणाचीही चौकशी करण्यात येत आहे.









