पुणे / वार्ताहर :
महापालिकेच्या भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी वैद्यकीय महाविद्यालयाच्या अधिष्ठात्यांना प्रवेशासाठी दहा लाखांची लाच घेताना अटक झाल्यानंतर तोडफोड केल्याप्रकरणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या (मनसे) कार्यकर्त्यांविरुद्ध फरासखाना पोलिसांनी गुन्हा दाखल केला. मनसेचे आशिष साबळे, प्रशांत कनोजिया, धनंजय गवळी यांच्यासह सहा ते सातजणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वैद्यकीय महाविद्यालयातील वरिष्ठ तांत्रिक भाऊसाहेब माने यांनी याबाबत फरासखाना पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
वैद्यकीय शाखेत प्रवेश देण्यासाठी दहा लाख रुपये लाच घेताना अटलबिहारी वाजपेयी वैद्यकीय महाविद्यालयाचा अधिष्ठाता डॉ. आशिष श्रीनाथ बंगिनवार (वय 54) यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने मंगळवारी (8 ऑगस्ट) सायंकाळी अटक केली. त्यानंतर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे कार्यकर्ते बुधवारी (9 ऑगस्ट) दुपारी वैद्यकीय रुग्णालयाच्या आवारात जमले. कार्यकर्त्यांनी अधिष्ठाता डॉ बंगिनवार यांच्या निषेधार्थ घोषणा देऊन कक्षाची तोडफोड केली. मनसेच्या कार्यकर्त्यांनी वैद्यकीय महाविद्यालयाच्या कार्यालयातील तीन संगणक, खुर्च्यांची तोडफोड केली.









