भारतीय जनता पक्षाच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारच्या विरोधात विरोधकांनी मांडलेला अविश्वास ठराव गुरुवारी, १० ऑगस्ट रोजी पावसाळी अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी लोकसभेत पराभूत झाला. सध्या सुरू असलेल्या पावसाळी अधिवेशनात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पहिल्यांदाच हजेरी लावून जोरदार भाषण केले. त्यांच्या भाषणाचा विरोध करत विरोधकांनी सभात्याग केला. त्यानंतर लोकसभेचे सभापती ओम बिर्ला यांनी आवाजी मतदान घेऊन हा अविश्वास प्रस्ताव फेटाळला.
विरोधकांनी आणलेला अविश्वास प्रस्ताव “भाजपच्या नेतृत्वाखालील केंद्रासाठी नेहमीच भाग्यवान ठरला आहे” असे म्हणत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी इंडिया या नव्या आघाडीचा खिल्ली उडवली. ते म्हणाले, “मी पाहतोय की, 2024 च्या लोकसभा निवडणुकीत एनडीए आणि भाजप अधिक मताधिक्याने पूर्वीचे सर्व रेकॉर्ड मोडून काढेल.”
पंतप्रधान मोदींनी भाषणाच्या पहिल्या 90 मिनिटांत मणिपूरचा संदर्भ नसल्याची तक्रार करत विरोधी पक्षाच्या खासदारांनी लोकसभेतून सभात्याग केला. पंतप्रधानांच्या उत्तरादरम्यान ‘मणिपूर…मणिपूर’ असा नारा देत विरोधकांनी त्यांना ईशान्येकडील राज्यातील वांशिक हिंसाचारावर बोलण्याचे आवाहन केले आणि त्यानंतर पंतप्रधान बोलत असताना विरोधी गटाच्या खासदारांनी सभात्याग केला. त्यानंतर भारत राष्ट्र समिती (BRS) आणि शिरोमणी अकाली दल (SAD) च्या सदस्यांनीही सभागृहातून सभात्याग केला.
विरोधकांनी सभात्याग केल्यानंतर काँग्रेस खासदार शशी थरूर म्हणाले, “आम्ही पंतप्रधानांना मणिपूरवर देशाला संबोधित करण्यास सांगितले. 1 तास 45 मिनिटे त्यांनी मणिपूर शब्दाचा उल्लेख केला नव्हता. ते निव्वळ राजकीय भाषण करत होते, काँग्रेस पक्ष आणि विरोधकांवर सर्व जुने हल्ले करून अपमान केला. परंतु अविश्वास प्रस्तावाने उपस्थित केलेल्या प्रश्नांची उत्तरे त्यांच्या भाषणात नव्हती” असे ते म्हणाले.