Kolhapur City Direct Pipeline Schemes : कोल्हापूर शहरासाठी महत्त्वाच्या असलेल्या थेट पाईपलाईन योजनेचे काम गेले महिनाभर सुरु आहे. 9 जुलैच्या दरम्यान काळम्मावाडी धरणक्षेत्रात झालेल्या जोरदार पावसाने धरणातील वाढलेले पाणी जॅकवेलमध्ये पोहोचले.त्यानंतर ५० एचपीच्या दोन पंपातून पाणी उपसून २० किलोमीटरपर्यंतच्या पाईपमधून सोडून चाचणीही घेण्यात आली. त्यामुळे योजनेतील महत्त्वाचा टप्पा पूर्ण झाला होता. जॅकवेलवर पंप बसवण्याबरोबरच वीजवाहिनी, उर्वरित पाईपलाईनची स्वच्छता अशी थेट पाईपलाईन योजनेतील सारी कामे ऑगस्टअखेर पूर्ण होतील. त्यानंतर महिनाभर चाचणी घेतली जाईल, असे आमदार सतेज पाटील यांनी काळम्मावाडी धरणस्थळावर जॅकवेलच्या पाण्याचे पूजन करताना कामाची डेडलाईन दिली होती. त्यानुसार चाचणी सुरू झाली. मात्र चाचणीवेळीच तुरंबेजवळील अर्जुनवाडा येथील थेट पाईपलाईनचा एअर वॉल बुधवारी (ता-9) ऑगस्टला फुटला.युध्दपातळीवर अधिकारी आणि कर्मचारी दुरुस्तीचे काम करत आहेत. मात्र लाखो लिटर पाणी वाया गेल्याने हळहळ व्यक्त होत आहे.
कोल्हापूर शहराला काळम्मावाडी धरणातून थेट पाईपलाईन योजनेतून पाणी मिळावे यासाठी सतेज पाटील प्रयत्न करत आहेत. थेट पाईपलाईन झाली नाही तर निवडणूक लढवणार नाही,अशी भूमिका घेत सतेज पाटील यांनी २०१४ मध्ये योजना मंजूर करण्यापासून सतत पाठपुरावा केला. अनेक टप्प्यांवर आलेल्या अडचणींवर मार्ग काढण्यासाठी कसोशीने प्रयत्न केले.शहरवासीयांच्या ४० वर्षांपासूनच्या मागणीच्या पूर्ततेच्या टप्प्यावर आता योजना पोहोचली आहे. दरम्यान चाचणीवेळीच एअर वॉल फुटला.