मटण, चिकन, अंडी, खेकड्यांना पसंती : मागणीत वाढ
बेळगाव : श्रावण अवघ्या आठ दिवसांवर आल्याने मटण, चिकन, मासळी, अंडी आणि खेकड्यांची मागणी वाढली आहे. 17 ऑगस्टपासून निज श्रावण महिन्याला प्रारंभ होणार आहे. तत्पूर्वी मांसाहार खवय्यांची चंगळ सुरू असल्याचे पाहायला मिळत आहे. शहराबरोबर ग्रामीण भागातील मटण, चिकन दुकानात नागरिकांची वर्दळ वाढू लागली आहे. विशेषत: श्रावण महिन्यात मांसाहार वर्ज्य केला जातो. त्यामुळे मांसाहाराला आताच पसंती दिली जात आहे. 17 ऑगस्टपासून श्रावणात पूजा-अर्चा, धार्मिक विधींच्या कार्यक्रमांची रेलचेल सुरू होते. त्यामुळे मांसाहार प्रेमींकडून आताच ताव मारला जात आहे. श्रावण जवळ आल्याने मांसाहाराची मागणी वाढू लागली आहे. विशेषत: मंगळवार, बुधवार आणि रविवारी खरेदी मोठ्या प्रमाणात होऊ लागली आहे. त्यामुळे कोथिंबीर व लिंबुंना मागणी वाढत आहे. भाजीपाल्याचे दर गगनाला भिडले आहेत. टोमॅटो, वांगी, बिन्स, प्रतिकिलो शंभर रुपयांच्या पुढे गेले आहेत. त्यामुळे काहीजण अंड्यांना पसंती देऊ लागले आहेत. भाजीपाल्याच्या तुलनेत अंड्यांचा दर आवाक्यात आहे. शहरात मटण 680 रु., चिकन 190 रुपये प्रतिकिलो विक्री होऊ लागली आहे. अंडी शेकडा 480 रु., बांगडा 150 रु., खेकडा 200 रुपयांना चार ते पाच नग असा दर आहे. विशेषत: आवाक्यात असलेल्या चिकनला मटणाच्या तुलनेत अधिक मागणी आहे. श्रावणला प्रारंभ होण्यास केवळ आठवडाभराचा कालावधी राहिल्याने मांसाहाराला मागणी वाढू लागली आहे.
तुलनेत मटणला मागणी कमी
पुढील आठवड्यापासून श्रावण सुरू होणार असला तरी मटणला मागणी कमी आहे. त्या तुलनेत चिकन आणि अंड्यांना मागणी वाढली आहे. हंगामानुसार खेकड्यांची खरेदीही होऊ लागली आहे.
उदय घोडके, अध्यक्ष, बेळगाव मटण विक्री असोसिएशन









