मोठमोठे खड्डे पडल्यामुळे वाहतुकीसाठी रस्ता धोकादायक : दुरुस्तीकडे दुर्लक्ष
वार्ताहर /किणये
तालुक्याच्या पश्चिम भागातील महत्त्वाचा असणारा कर्ले ते कावळेवाडी संपर्क रस्ता खड्डेमय बनला आहे. या रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडल्यामुळे वाहतूक करणे धोकादायक बनले आहे. प्रशासनाचे या रस्त्याच्या दुरुस्तीकडे साफ दुर्लक्ष झाले असल्याच्या तक्रारी नागरिकांतून होत आहेत. या रस्त्यावरील खड्डे बुजविण्यात यावेत, अशी मागणी वाहनधारकांतून होत आहे. कावळेवाडी-कर्ले संपर्क रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडलेले आहेत. त्या ख•dयांमध्ये पावसाचे पाणी साचले आहे. रात्रीच्या वेळी अनेक दुचाकीस्वार या ख•dयांमध्ये पडून किरकोळ अपघाताच्या घटना घडल्या आहेत. मोठी दुर्घटना होण्याआधीच रस्त्यांची दुरुस्ती करावी, अशी मागणी जोर धरू लागली आहे.
बिजगर्णी, कावळेवाडी, जानेवाडी, कर्ले, बेळवट्टी, बेळगुंदी, बहाद्दरवाडी, किणये भागातील वाहनधारकांची या रस्त्यावर रोज मोठ्याप्रमाणात वर्दळ असते. पश्चिम भागातील हा महत्त्वाचा रस्ता आहे. मात्र या रस्त्यावरील खड्डे बुजविणार कोण, असा सवाल वाहनधारक करू लागले आहेत. गेल्या दोन वर्षापासून या रस्त्यावर खड्डे पडलेले आहेत. या ख•dयांच्या दुरुस्तीकडे प्रशासनाने दुर्लक्ष केले असल्यामुळे आता आपण दाद मागायची कुणाकडे, असेही नागरिकांतून बोलले जात आहे. या परिसरात असलेल्या प्राथमिक व माध्यमिक शाळांना जाणाऱ्या विद्यार्थ्यांनाही सदर रस्त्यावरून ये-जा करावी लागते. त्यामुळे ख•dयांतून विद्यार्थ्यांना मार्ग काढताना अडथळा निर्माण होऊ लागला आहे. रस्त्यावरील खड्डे बुजविल्यास शेतकऱ्यांनाही सोयीचे ठरणार आहे.भागातील ग्रा. पं. सदस्यांनी रस्त्याबद्दल लोकप्रतिनिधींना माहिती द्यावी आणि सदर खड्डे बुजविण्यासाठी प्रयत्न करावेत, अशी मागणीही होत आहे.









