वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
यंदा होणार असलेल्या आयसीसी क्रिकेट विश्वचषक स्पर्धेच्या वेळापत्रकात बदल करण्यात आला असून भारत आणि पाकिस्तान यांच्यातील बहुप्रतिक्षित सामना वेगळ्या दिवशी ठेवण्यात आला आहे. याशिवाय स्पर्धेतील इतर आठ सामन्यांची तारीख देखील बदलण्यात आली आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेट मंडळाने बुधवारी भारतात होणार असलेल्या आगामी विश्वचषक स्पर्धेचे सुधारित वेळापत्रक जाहीर केले.
भारत व पाकिस्तान यांच्यातील सामना अहमदाबादमध्ये रविवार 15 ऑक्टोबर रोजी होणार होता. परंतु ही लढत एक दिवस आधी हलवली गेली असून आता शनिवार 14 ऑक्टोबर रोजी त्याच मैदानावर होणार आहे. परिणामी इंग्लंडचा दिल्लीतील अफगाणिस्तानविरुद्धचा सामना शनिवार 14 ऑक्टोबरऐवजी 24 तासांनंतर रविवार 15 ऑक्टोबरला खेळवला जाईल. हैदराबादमधील श्रीलंकेविऊद्धची पाकिस्तानची लढत गुरुवार 12 ऑक्टोबरऐवजी आता मंगळवार 10 ऑक्टोबर रोजी खेळवली जाणार आहे आणि लखनौमधील दक्षिण आफ्रिकेविरुद्धची ऑस्ट्रेलियाची महत्त्वाची लढत 24 तास मागे आणून शुक्रवार 13 ऑक्टोबरऐवजी गुरुवार 12 ऑक्टोबर रोजी खेळवली जाईल.
त्याचप्रमाणे न्यूझीलंडचा बांगलादेशविरुद्धचा सामना चेन्नई येथे 14 ऑक्टोबर रोजी ठेवण्यात आला होता. सदर सामना मागे आणला गेला आहे आणि आता तो शुक्रवार 13 ऑक्टोबर रोजी आयोजित केला जाईल. हा सामना आधी दिवसा होणार होता, आता तो दिवस-रात्र खेळविला जाईल. स्पर्धेच्या सुरुवातीच्या टप्प्यातील सामन्यात किरकोळ बदल बदल करण्यात आला असून तो धर्मशाला येथे होणाऱ्या बांगलादेश-इंग्लंडच्या सामन्याच्या वेळेसंदर्भात आहे. हा सामना दिवस-रात्र खेळविला जाणार होता. मात्र आता तो दिवसा खेळविला जाणार असून सकाळी 10.30 वा. (स्थानिक वेळेनुसार) सुरू होईल.
साखळी फेरीच्या शेवटच्या टप्प्यात तीन बदल केले आहेत. त्यानुसार रविवार, 12 नोव्हेंबर रोजी ठेवलेले दोन सामने एक दिवस आधी शनिवार 11 नोव्हेंबर रोजी खेळविले जातील. यात पुण्यातील ऑस्ट्रेलिया विऊद्ध बांगलादेश (सकाळी 10.30 वा. प्रारंभ) आणि कोलकातामधील इंग्लंड विऊद्ध पाकिस्तान (दुपारी 2 वा. प्रारंभ) यांचा समावेश आहे. तर नेदरलँड्सविऊद्धचा भारताचा शेवटचा साखळी सामना 11 नोव्हेंबरऐवजी 12 नोव्हेंबरला होणार आहे. हा सामना बेंगळूरमध्ये खेळवला जाणार आहे.
गुरुवार 5 ऑक्टोबर रोजी विश्वचषक स्पर्धा सुरू होणार आहे. त्यात 2019 च्या स्पर्धेच्या अंतिम फेरीतील संघ इंग्लंड आणि न्यूझीलंड अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर भिडणार आहेत. रविवार 19 नोव्हेंबर रोजी त्याच ठिकाणी अंतिम सामना होऊन या स्पर्धेचा समारोप होईल.









