लोंबकळणाऱ्या विद्युतवाहिन्यांची लवकरच दुरुस्ती
बेळगाव : जिल्हा पालकमंत्री सतीश जारकीहोळी यांच्या अध्यक्षतेखाली सोमवारी महानगरपालिकेमध्ये झालेल्या बैठकीत शहरात लोंबकळणाऱ्या विद्युतवाहिन्यांविषयी महामंडळांनी तक्रारी दाखल केल्या होत्या. या तक्रारींची दखल घेत मंगळवारी हेस्कॉमच्या शहर विभागातील अधिकाऱ्यांनी संपूर्ण विसर्जन मार्गाची पाहणी केली. तसेच खडक गल्ली येथील विद्युतवाहिन्या काढण्याबाबत मंडळाच्या कार्यकर्त्यांशी चर्चा केली. चन्नम्मा चौकापासून या पाहणीला सुरुवात झाली. खडक गल्ली येथे यावर्षी मोठ्या उत्साहात गणेशोत्सव साजरा केला जाणार आहे. त्यामुळे लोंबकळणाऱ्या विद्युतवाहिन्या काढण्याची मागणी मंडळाच्या कार्यकर्त्यांनी हेस्कॉमकडे केली होती. हेस्कॉमच्या अधिकाऱ्यांनी ज्याठिकाणी मंडप उभारणी केली जाते, त्याठिकाणची पाहणी केली. 11 केव्ही विद्युतवाहिन्या काढून त्या एकाच बाजूने घालण्याची विनंती कार्यकर्त्यांनी केली. यासंदर्भात भूमीगत वीजवाहिन्यांचा शिल्लक निधी किती आहे, ते तपासून पुढील काम केले जाणार असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. धर्मवीर संभाजी चौकापासून कपिलेश्वर तलावापर्यंत अधिकाऱ्यांनी विसर्जन मार्गाची पाहणी केली. धोकादायक स्थितीतील विद्युतवाहिन्यांचा सर्व्हे करून दुरुस्त करण्याबाबत निर्णय घेतला जाणार आहे. ज्या मंडळांनी हेस्कॉमकडे तक्रार दाखल केली होती, त्याठिकाणी जाऊन दुरुस्तीचे काम करण्याचे आश्वासन दिले. हेस्कॉमचे शहर कार्यकारी अभियंते सुनीलकुमार, शहर उपविभाग 3 चे साहाय्यक कार्यकारी अभियंते ए. एम. शिंदे, शहर उपविभाग 1 चे संजीव हंमण्णावर, सेक्शन ऑफिसर सिधू अंगडी, सिद्धराम कांबळे यांसह इतर कर्मचारी उपस्थित होते.









