नाश्ता-जेवणाची सोय : पुन्हा उर्जितावस्थेत
बेळगाव : गोरगरीब कष्टकऱ्यांना अल्पदरात नाश्ता आणि जेवण उपलब्ध व्हावे, यासाठी शहरात इंदिरा कॅन्टीनची सुरुवात करण्यात आली आहे. मध्यंतरी ओस पडलेल्या इंदिरा कॅन्टीनमध्ये आता लाभार्थ्यांची वर्दळ वाढू लागली आहे. विशेषत: काँग्रेस सरकारने सत्तेवर येताच इंदिरा कॅन्टीनमध्ये भाजी आणि भाकरी उपलब्ध करण्याचे आश्वासन दिले आहे. त्यामुळे इंदिरा कॅन्टीनला उर्जितावस्था प्राप्त होऊ लागली आहे. शहरातील बसस्टँड रोड, एपीएमसी आवार, आझमनगर, जिल्हा रुग्णालय, क्लब रोड, गोवावेस सर्कल, नाथ पै सर्कल, कणबर्गी रोड आदी ठिकाणी इंदिरा कॅन्टीन उभारण्यात आली आहेत. या ठिकाणी नागरिकांना केवळ पाच रुपयात नाश्ता आणि दहा रुपयात जेवण दिले जात आहे. त्यामुळे गोरगरीब, निराधार, कष्टकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. विशेषत: क्लब रोड, बसस्टँड रोड येथील कॅन्टीनमध्ये लाभार्थ्यांचा प्रतिसाद वाढला आहे.
शहरात गोरगरीब, कष्टकरी आणि निराधारांची संख्या अधिक आहे. या नागरिकांना इंदिरा कॅन्टीन आधार ठरू लागले आहे. मध्यंतरी अनुदान व इतर कारणांमुळे इंदिरा कॅन्टीनना उतरती कळा लागली होती. तर काही कॅन्टीन बंदही झाली होती. मात्र काँग्रेस सरकार सत्तेवर येताच इंदिरा कॅन्टीन पुन्हा गोरगरिबांच्या सेवेत दाखल झाली आहेत. अलीकडे इंदिरा कॅन्टीनमध्ये नाश्ता व जेवणदेखील रुचकर मिळू लागले आहे. त्यामुळे काही कॉलेजचे विद्यार्थीदेखील याचा लाभ घेत आहेत. मध्यंतरी या कॅन्टीनची अवस्था बिकट बनली होती. मात्र आता पुन्हा कॅन्टीन पूर्ववत सुरू झाली आहेत. शिवाय सरकार सत्तेत येताच कॅन्टीन पुनरुज्जीवन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. शिवाय नाश्ता, जेवण व भाजी भाकरीदेखील उपलब्ध करण्याचे आश्वासन दिले आहे. त्यामुळे येत्या काळात फुल्ल जेवणच कॅन्टीनमध्ये उपलब्ध होणार आहे.









