तालुक्यातील रस्त्यांच्या विकासाबाबत मांडल्या समस्या : गडकरींकडून सकारात्मक प्रतिसाद
खानापूर : खानापूर तालुक्यातील रस्त्यांच्या विकासाबाबत आमदार विठ्ठल हलगेकर यांनी दिल्ली येथे केंद्रीय रस्ते विकास मंत्री नितीन गडकरी यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेऊन रस्त्यासंदर्भात चर्चा केली. तसेच रस्त्यांच्या विकासासाठी निधी मंजूर करावा, अशी विनंती केली. यावेळी जिल्हा भाजप उपाध्यक्ष प्रमोद कोचेरी, युवानेते अभिजीत चांदीलकर होते. यावेळी नितीन गडकरी यांनी सविस्तर चर्चा करून अधिकाऱ्यांना योग्य क्रम घेण्याच्या सूचना दिल्या. तसेच रस्त्याच्या कामाविषयी निधी उपलब्ध करण्यासंदर्भात आराखडा तयार करण्याचे आदेश दिले आहेत. आमदार विठ्ठल हलगेकर यांनी तालुक्यातील रस्त्यांबाबत गांभीर्याने घेतले असून जिल्हाधिकाऱ्यांसमवेत झालेल्या बैठकीत त्यांनी सांगितल्याप्रमाणे मंत्री नितीन गडकरी यांची भेट घेऊन आपण याबाबत प्रयत्न करू, असे सांगितले होते. त्याप्रमाणे आमदार हलगेकर आणि सहकाऱ्यांनी मंगळवारी रस्ते विकास मंत्री नितीन गडकरी यांच्याशी संपर्क साधला.यावेळी गडकरी यांनी संबंधित रस्त्याच्या अधिकाऱ्यांना कार्यालयात बोलावून विठ्ठल हलगेकर यांच्याशी सविस्तर चर्चा केली.
आमदार हलगेकर यांनी बेळगाव-गोवा व्हाया रामनगर रस्त्याच्या कामाबाबत तसेच खानापूर ते गोवा हद्दीपर्यंतच्या रस्त्याचे काम संथगतीने सुरू आहे. या रस्त्यावर पुलांचे काम बंद केले आहे. याबाबत त्यांनी चर्चा केली. ज्या ठिकाणी वनखात्याचा अडथळा आहे. त्या ठिकाणी वनखात्याकडून अडचण निर्माण होऊ नये, तसेच खानापूर-गोवा हद्दीपर्यंतचा रस्ता त्वरित पूर्ण करावा, यासाठी आपण लक्ष घालावे, अशी विनंती केली. यावर मंत्री नितीन गडकरीनी रस्त्यासंदर्भात ठोस भूमिका घेऊन हा रस्ता पूर्ण करण्यासाठी योग्य उपाययोजना कराव्यात, असे अधिकाऱ्यांना सांगितले. तसेच वरिष्ठ अधिकाऱ्यांशी चर्चा करून पुढील कारवाई तातडीने पूर्ण करण्यासाठी आदेश दिले आहेत. त्यामुळे खानापूर शहरातील राजा टाईल्स ते गोवा क्रॉस रस्ताकाम सुरू होणार असल्याचे स्पष्ट होत आहे. सध्या ज्या कंत्राटदाराला हे काम दिले आहे. त्याच्याशी अधिकाऱ्यांची बैठक घेण्याचे निर्देश नितीन गडकरी यांनी दिले. तसेच पर्यावरण खात्याकडून रस्ता रुंद करण्यासाठी मंजुरी मिळाल्यास बेळगाव-चोर्ला रस्ता चौपदरी करणार असल्याचे सांगितले. आमदार हलगेकर यांनी मंत्री नितीन गडकरींची भेंट घेऊन सविस्तर चर्चा केल्याची माहिती ‘तरुण भारत’शी बोलताना दिली.









