रस्ता, वीज, शिक्षणाची वानवा : जंगली श्वापदांच्या हल्ल्यामुळे ग्रामस्थ हैराण : ग्रा. पं. उपाध्यक्ष सुनील देसाई यांच्याकडून समस्यांची दखल
वार्ताहर /जांबोटी
खानापूर तालुक्मयाच्या पश्चिम भागातील दुर्गम गावांतील अनेक वाड्या-वस्त्यामध्ये रस्ता, पाणी, शिक्षण, वीज आदी मूलभूत सुविधा उपलब्ध नसल्यामुळे नागरिकांची मोठी गैरसोय होत आहे. जांबोटी ग्राम पंचायत कार्यक्षेत्रातील चिरेखानी गावाला 21 व्या शतकात देखील मूलभूत सुविधांची वानवा असल्यामुळे हे गाव विकासापासून कोसो मैल दूर राहिले आहे. जांबोटी ग्राम पंचायत कार्यक्षेत्रातील सुमारे दीडशे वर्षांपूर्वी वसलेल्या चिरेखानी या गावात सुमारे 25 ते 30 कुटुंबांचे वास्तव्य आहे. या वाड्याची लोकसंख्या सुमारे 250 च्या घरात असून गुरे पाळणे हाच या गावातील नागरिकांचा मुख्य व्यवसाय आहे. चौफेर घनदाट जंगलाने व्यापलेल्या या गावाच्या विकासाकडे शासनाचे साफ दुर्लक्ष झाल्यामुळे हे गाव समस्यांच्या विळख्यात अडकले असून रस्ता, वीज, पाणी, शिक्षण, आरोग्य यासारख्या मूलभूत सुविधादेखील उपलब्ध नसल्यामुळे येथील जनतेला दैनंदिन जीवन कंठणे मुश्कील झाले आहे.
रस्त्याची समस्या गंभीर
जांबोटी-चापोली या मुख्य रस्त्यापासून चिरेखानी गावापर्यंतच्या अॅप्रोच रस्त्याचे अंतर सुमारे साडेतीन किलोमीटर आहे. मागीलवषी पंतप्रधान ग्राम सडक योजनेतून जांबोटी-चापोली या रस्त्याची निर्मिती करण्यात आली असली तरी या रस्त्यापासून चिरेखानी गावापर्यंतच्या अॅप्रोच रस्त्याची अवस्था दयनीय झाली आहे. या रस्त्याचे आतापर्यंत एकदाही खडीकरण करण्यात आले नाही. उन्हाळ्यात ग्रामस्थांकडून रस्त्याची दुऊस्ती होत असल्यामुळे या रस्त्यावरून कशीबशी दुचाकी गाडी चालवता येते. मात्र पावसाळ्यात या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात चिखल व दलदल निर्माण होत असल्यामुळे या रस्त्यावरून चारचाकी, दुचाकी तर सोडाच साधी पायपीट करणे देखील मुश्कील होते. शालेय विद्यार्थ्यांना रोज साडेतीन किलोमीटर अंतर पायपीट करून मुख्य रस्ता गाठावा लागतो. गावात चारचाकी वाहने जाऊ शकत नसल्यामुळे कोणी व्यक्ती आजारी पडल्यास अथवा रानटी प्राण्यांच्या हल्ल्यात जखमी झाल्यास अशा ऊग्णाला चादरीचा पाळणा करून जांबोटीपर्यंत नेण्यात येते. रस्त्याची सोय नसल्याने आजारी व्यक्ती दगावण्याच्या घटना घडतात.
प्राथमिक शाळेच्या छताला गळती
चिरेखानी या गावात सुमारे वीस वर्षांपूर्वी प्राथमिक शाळेची सुऊवात करण्यात आली आहे. या ठिकाणी पाचवीपर्यंत वर्ग चालतात. मात्र येथील विद्यार्थ्यांना पुढील शिक्षणासाठी जांबोटी येथे यावे लागते. परंतु गावाला रस्त्याची सुविधा उपलब्ध नसल्यामुळे गावात वाहन येऊ शकत नसल्यामुळे येथील विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी पायपीट करणे जणू पाचवीलाच पुजलेले आहे. येथील विद्यार्थी रोज साडेतीन किलोमीटर अंतर पायपीट करून जांबोटी येथे शिक्षणासाठी जातात. मात्र विद्यार्थ्यांना घनदाट जंगल भागातून पायपीट करावी लागत असल्यामुळे अस्वल, वाघ, बिबट्या, गवीरेडे आदी हिंस्त्र प्राण्यांच्या हल्ल्याची भीती असल्यामुळे जीव मुठीत घेऊन ये-जा करावी लागते. तसेच शाळेला गेलेली मुले सायंकाळी घरी परतल्यानंतरच पालकांचा जीव भांड्यात पडतो. या गावातील प्राथमिक शाळेची इमारत सुमारे पंधरा वर्षांपूर्वी बांधण्यात आली आहे. मात्र शाळेच्या इमारतीला देखील गळती लागल्यामुळे विद्यार्थ्यांना जीव मुठीत घेऊन शिक्षण घ्यावे लागत आहे. त्यामुळे शालेय विद्यार्थ्यांच्या आरोग्याला धोका निर्माण झाला आहे. छतावर प्लास्टिकची ताडपत्री घालून कसे बसे या गावातील बालकांना शिक्षण घ्यावे लागत आहे.
रानटी श्वापदांच्या हल्ल्यांची वाढती भीती
चिरेखानी हे गाव चोहोबाजूने घनदाट जंगलाने वेढले आहे. त्यामुळे या गावातील नागरिकांवर रानटी हिंस्त्र प्राण्यांच्या हल्ल्याची टांगती तलवार आहे. या जंगलात वाघ, अस्वले, बिबट्या, गवीरेडे आदी प्राण्यांचा दिवसाढवळ्या देखील राजरोसपणे वावर असल्यामुळे गुरे चारण्यासाठी जंगलात गेलेले गुराखी तसेच शेतवडीत काम करणाऱ्या शेतकऱ्यावर जंगली प्राणी मोठ्या प्रमाणात हल्ला करून गंभीर जखमी करतात. अशा घटना आठवड्यातून किमान एकदा-दोनदा तरी घडतात. मात्र या गावाला रस्त्याची समस्या देखील उपलब्ध नसल्यामुळे जंगली प्राण्यांच्या हल्ल्यात जखमी झालेल्या व्यक्तींना डॉक्टरकडे घेऊन जाईपर्यंत जखमी व्यक्तींचा मृत्यू झाल्याच्या घटना देखील घडल्या आहेत.
उन्हाळ्यात पाण्यासाठी हाल
चिरेखानी ग्रामस्थांना वीज, पाणी आदी समस्यांनीही ग्रासले असून या गावाला उन्हाळ्यात तीव्र पाणी टंचाईच्या समस्येचा सामना करावा लागत असल्यामुळे नागरिकांचे पाण्यासाठी हाल होतात. तसेच या गावच्या वीजवाहिन्या घनदाट जंगलमय प्रदेशातून गेल्या असल्यामुळे पावसाळ्यात वीज वाहिन्यावर वृक्ष उन्मळून पडणे, झाडांच्या फांद्या पडणे यासारख्या कारणामुळे पावसाळ्यातील किमान दोन-तीन महिने तरी वीजपुरवठा ठप्प होत असल्याने नागरिकांना अंधाराचा सामना करावा लागतो.
जांबोटी ग्रा.पं.उपाध्यक्ष सुनील देसाई यांची गावाला भेट 
चिरेखानी गावात रस्ता, वीज व विद्यार्थ्यांची शिक्षणासाठी होणारी पायपीट आदी समस्या सोडवण्यासाठी जांबोटी ग्राम पंचायतीचे नवनिर्वाचित उपाध्यक्ष सुनील देसाई यांनी दोन दिवसांपूर्वी प्रत्यक्षात चिरेखानी गावाला भेट दिली. तसेच ग्राम पंचायत सदस्य अंजना शिवाजी हणबर तसेच ग्रामस्थांची व विद्यार्थ्यांची भेट घेऊन या गावच्या समस्या सोडविण्यासाठी ग्राम पंचायतीच्यावतीने सर्वतोपरी सहकार्य करण्याचे आश्वासन दिले आहे. तसेच गळती लागलेल्या प्राथमिक शाळेच्या छतावर झाकण्यासाठी प्लास्टिक ताडपत्रीची व्यवस्था करून शालेय विद्यार्थ्यांची तात्पुरती गैरसोय दूर केली आहे. खानापूरचे आमदार विठ्ठल हलगेकर यांची भेट घेऊन चिरेखानी गावच्या समस्या त्यांच्यासमोर मांडून त्या सोडवण्यासाठी आपण कटिबद्ध असल्याचे आश्वासन सुनील देसाई यांनी ‘तऊण भारत’शी बोलताना दिले









