वृत्तसंस्था/ दुबई
आयसीसीतर्फे पुरुष आणि महिलांच्या क्रिकेट विभागात दर्जेदार कामगिरी करणाऱ्या क्रिकेटपटूंचा आढावा घेऊन प्रत्येक महिन्याला सर्वोत्तम क्रिकेटपटूची निवड केली जाते. 2023 च्या जुलै महिन्यासाठी महिला विभागात सर्वोत्तम क्रिकेटपटूच्या मानांकनामध्ये नुकत्याच झालेल्या महिलांच्या अॅशेस मालिकेतील ऑस्ट्रेलियाच्या दोन तर इंग्लंडच्या एका अष्टपैलूची शिफारस करण्यात आली आहे. ऑस्ट्रेलियातर्फे एलिस पेरी, अॅश्ले गार्डनर तर इंग्लंडतर्फे नॅट स्किव्हर ब्रंट यांची शिफारस या पुरस्कारासाठी करण्यात आली आहे.
ऑस्ट्रेलियाची अष्टपैलू एलिस पेरी हिची 2023 च्या जुलै महिन्यातील कामगिरी दर्जेदार झाली असल्याने आयसीसीच्या सर्वोत्तम महिला क्रिकेटपटूच्या पुरस्काराकरिता तिची शिफारस करण्यात आली आहे. अॅशेस टूरमध्ये एलिस पेरीने वनडे आणि टी-20 या दोन्ही प्रकारात अव्वल कामगिरी केली आहे. वनडे क्रिकेटमध्ये तिने 4 डावात 69 धावांच्या सरासरीने 276 धावा जमवल्या आहेत. 91 ही तिची सर्वोच्च धावसंख्या आहे. एलिस पेरीने इंग्लंडविरुद्ध आणि त्यानंतर डब्लिनमध्ये आयर्लंडविरुद्ध 91 धावा जमवल्या होत्या. तिने 158.62 स्ट्राईक रेट राखताना 27 चेंडूत नाबाद 51 धावा झोडपल्या होत्या. या कामगिरीमुळे ऑस्ट्रेलियन महिला संघाने टी-20 तील दुसऱ्या सामन्यात इंग्लंडवर विजय मिळवला होता. पेरीकडून या अॅशेस मालिकेत फलंदाजीत सातत्य राखत सातत्याने धावा जमवल्या गेल्या आहेत.
ऑस्ट्रेलियाची आणखी एक अष्टपैलू महिला क्रिकेटपटून अॅश्ले गार्डनर हिची या पुरस्कारासाठी शिफारस करण्यात आली आहे. आयसीसीच्या महिलांच्या टी-20 प्रकारातील अष्टपैलू खेळाडूंच्या मानांकनात गार्डनरने पहिले स्थान मिळवले आहे. वनडे प्रकारातील पाच सामन्यात गार्डनरने इंग्लंड आणि आयर्लंडविरुद्ध फलंदाजीत 40 धावांच्या सरासरीने 160 धावा जमवल्या असून त्यामध्ये एका अर्धशतकाचा समावेश आहे. इंग्लंडमध्ये झालेल्या टी-20 च्या दोन सामन्यात तिने 30 धावांचा टप्पा ओलांडला होता. तिने तीन डावात 72 धावा जमवल्या. तसेच या मालिकेत तिने 2 गडी बाद केले. इंग्लंडविरुद्धच्या तीन वनडे सामन्यात गार्डनरने एकूण 9 गडी बाद केले आहेत. तसेच तिने प्रत्येक सामन्यात 20 पेक्षा अधिक धावा जमवल्या आहेत. तिने तीन वनडे सामन्यात एकूण 95 धावा केला आहेत. या मालिकेतील शेवटच्या सामन्यात गार्डनरने 24 चेंडूत 41 धावा जमवल्या होत्या.
इंग्लंडची नॅट स्किव्हर ब्रंट हिची जुलै महिन्यातील सर्वोत्तम महिला क्रिकेटपटूच्या पुरस्कारासाठी शिफारस करण्यात आली आहे. इंग्लंड संघाकडून खेळताना ब्रंटने आपल्या तंत्रशुद्ध आणि अचूक खेळाच्या जोरावर इंग्लंडला अॅशेस मालिकेत ऑस्ट्रेलियाबरोबर गुणतक्त्यात बरोबरी साधून दिली होती. तिने वनडे मालिकेतील पाठोपाठच्या दोन सामन्यात शतके झळकवून इंग्लंडला ही मालिका जिंकून देण्यामध्ये मोलाचे योगदान दिले. ब्रंटने या मालिकेत 271 धावा जमवल्या आहेत. आयसीसीच्या महिलांच्या वनडे फलंदाजांच्या मानांकन यादीत इंग्लंडची नॅट स्किव्हर ब्रंट 803 मानांकन गुणासह पहिल्या स्थानावर आहे.









