‘12 तुघलक लेन’ बंगला प्राप्त : राहुल म्हणाले ‘माझे घर संपूर्ण भारत’
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
लोकसभेचे सदस्यत्व पुन्हा मिळाल्यानंतर काँग्रेस नेते राहुल गांधी यांना आता त्यांचा बंगला परत मिळाल्याची माहिती सरकारी सूत्रांनी मंगळवारी दिली. केरळच्या वायनाड मतदारसंघाचे खासदार राहुल गांधी यांनी आपले अधिकृत खासदार निवासस्थान परत मागितल्याचे सांगण्यात येत आहे. त्यानुसार त्यांचे जुने निवासस्थान ‘12 तुघलक लेन’ पुन्हा देण्यात आले आहे.
काँग्रेस खासदार राहुल गांधी यांना खासदार म्हणून त्यांचे अधिकृत निवासस्थान परत मिळण्याबाबत प्रतिक्रिया विचारण्यात आली असता ‘माझे घर संपूर्ण भारत आहे.’ असे त्यांनी स्पष्ट केले. सुरत येथील न्यायालयाने राहुल गांधींना ‘मोदी आडनाव’ प्रकरणात दोषी ठरवत दोन वर्षांच्या तुऊंगवासाची शिक्षा सुनावल्यामुळे त्यांना संसदेच्या कनिष्ठ सभागृहातून अपात्र ठरवण्यात आले. नंतर गुजरात उच्च न्यायालयानेही काँग्रेस नेत्याची शिक्षा कायम ठेवली, मात्र सर्वोच्च न्यायालयाने त्यांच्या शिक्षेला स्थगिती दिली. न्यायालयाच्या या निर्णयानंतर गांधींना 2024 ची लोकसभा निवडणूक लढवता येणार आहे.
‘मोदी आडनाव’ संदर्भात काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या शिक्षेला सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती दिल्यानंतर तीन दिवसांनी सोमवारी काँग्रेस नेते राहुल गांधी यांना लोकसभा सदस्यत्व बहाल करण्यात आले. लोकसभा सचिवालयाने यासंदर्भात अधिसूचना जारी केली होती. सर्वोच्च न्यायालयाच्या 4 ऑगस्टच्या निर्णयाच्या पार्श्वभूमीवर गांधींच्या अपात्रतेच्या 24 मार्चच्या अधिसूचनेची अंमलबजावणी पुढील न्यायिक निर्णयापर्यंत स्थगित करण्यात आल्याचे अधिसूचनेत सांगण्यात आले होते. खासदारकीपाठोपाठ आता राहुल गांधी यांना सरकारी बंगलाही पुन्हा मिळाल्यामुळे काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.