विजेचे बिल अधिक आल्याच्या संतापातून कृत्य
वृत्तसंस्था/ गंजम
ओडिशाच्या गंजम जिल्ह्यात एका इसमाने मीटर रीडरची हत्या केली आहे. विजेचे बिल अधिक आल्याने संबंधित इसम नाराज होता. आरोपीचे नाव गोविंद सेठी असून पोलिसांनी त्याला अटक केली आहे. तर मृत मीटर रीडरचे नाव लक्ष्मीनारायण त्रिपाठी असून ते टीपी साउथर्न ओडिशा डिस्ट्रीब्यूशन लिमिटेडचे कर्मचारी होते.
लक्ष्मीनारायण त्रिपाठी हे गावात विजेच्या बिलांचे वाटप करत होते. संबंधित आरोपीच्या घराचे विजेचे बिल अधिक होते. वाढीव बिलांवरून त्रिपाठी अन् सेठी यांच्यात वाद सुरू झाला, यादरम्यान संतप्त झालेल्या आरोपीने धारदार अस्त्राने मीटर रीडरवर हल्ला केला. भांडणाचा आवाज ऐकून तेथे पोहोचलेल्या शेजाऱ्याचे बोट देखील यात कापले गेले. घटनास्थळी लोकांची गर्दी वाढल्यावर आरोपीने स्वत:ला घरात कैद करून घेतले होते. लक्ष्मीनारायण त्रिपाठी हे कुटुंबात एकमेव कमावते असल्याने नुकसान भरपाई देण्यात यावी अशी मागण मीटर रीडर्सनी केली आहे.









