दिल्ली सेवा विधेयक संमत होण्याची पार्श्वभूमी : आतिशी यांना वाढीव जबाबदारी
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
दिल्लीतील अरविंद केजरीवाल सरकारमध्ये मंगळवारी मोठा फेरबदल झाला आहे. मंत्री आतिशी यांना आता सेवा अन् दक्षता विभागाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. राज्यसभेत सोमवारीच दिल्ली सेवा विधेयक संमत झाल्याच्या पार्श्वभूमीवर हा फेरबदल करण्यात आला आहे. हे दोन्ही विभाग यापूर्वी सौरभ भारद्वाज यांच्या अखत्यारित होते. मुख्यमंत्री अरविंद केजरीवालांनी खात्यांमध्ये फेरबदल करण्याच्या निर्णयाशी संबंधित फाइल उपराज्यपालांना पाठविली आहे.
काही महिन्यांपूर्वीच दिल्ली सरकारच्या मंत्रिमंडळात फेरबदल करण्यात आला होता. माजी आरोग्यमंत्री सत्येंद्र जैन आणि माजी उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया हे तुरुंगात गेल्याने आतिशी आणि सौरभ भारद्वाज यांना मंत्रिमंडळात सामील करण्यात आले होते. तेव्हा आतिशी यांना शिक्षण, सार्वजनिक बांधकाम विभाग, महिला आणि बालविकास, ऊर्जा, कला-संस्कृती आणि भाषा तसेच पर्यटन विभागाची जबाबदारी सोपविण्यात आली होती.
आतिशी यांनी 2020 साली झालेल्या विधानसभा निवडणुकीत कालकाजी मतदारसंघातून विजय मिळविला होता. आतिशी यांना दिल्लीतील शिक्षण क्षेत्रात घडलेल्या बदलांचे श्रेय दिले जाते. आतिशी यापूर्वी सिसोदिया यांच्या सल्लागार राहिल्या होत्या. आतिशी या ऑक्सफोर्ड विद्यापीठाच्या पदवीधर असून शिक्षण क्षेत्रात उत्तम कार्य करण्यासाठी त्यांना ओळखले जाते. आम आदमी पक्षाच्या राजकीय विषयक समितीच्या त्या सदस्य आहेत.