प्रतिनिधी,विटा
Sangli Crime News : बँकांचे एटीएम फोडणारी आंतरराज्य टोळी पकडण्यास विटा पोलिसांना यश आले आहे.संशयित सैफुल दुल्ली खान (वय- ३७) निसियुम नियाज अहमद (वय -२४) व हसन रहेमत (वय -५३, सर्व रा. हरियाणा राज्य) अशी त्यांची नांवे आहेत. त्यांच्याकडून सुमारे ६ लाख २० हजार ६०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे,अशी माहिती पोलिसांनी दिली.
याबाबत पोलिस निरीक्षक संतोष डोके यांनी दिलेली माहिती अशी, पोलीस उपनिरीक्षक विशाल येळेकर हे सुजय तांबेवाघ, संजय पाटील,विक्रम जाधव,अशोक मोरे,तुकाराम गावडे,शिवाजी खाडे,शंकर जगदाळे,विजय बर्डे,संभाजी कोळेकर असे आपल्या पथकासह खाजगी वाहनांमधून विटा ते तासगांव रस्त्यावरून गस्त घालत होते.येथील एच.पी.पेट्रोलपंपाच्या समोर रस्त्याला तासगांवकडून चारचाकी आयशर गाडी येत होती. त्या गाडीचा संशय आल्याने त्यास गुन्हे प्रकटन पथकाच्या पोलिसांनी थांबविण्यास सांगितला असता, चालकाने न थांबविता गाडी विट्याकडील बाजूला घेऊन गेला. पोलिसांनी पाठलाग करुन ही गाडी थांबवली.गाडीची झडती घेतली असता दोन वेल्डीग करण्यासाठी वापरण्यात येणारे सिलेन्डर,गॅस कटर,रबर पाईप, रेग्युलेटर,दोन चाकु,कागदपत्राच्या फाईली,तीन मोबाईल सापडले.याबाबत त्यांच्याकडे चौकशी केली असता, त्यांनी ते साहित्य हे एटीएम फोडण्यासाठी वापर करीत असल्याचे सागितले.
त्यांच्याकडे अधिक चौकशी केली असता ते करमाळा येथे एटीएम फोडून हे संशयित पळून आले आहेत,अशी माहिती संशयितांनी दिली.त्यांच्याकडून आयशर टेम्पो,एका प्लॉस्टीकच्या कागदामध्ये दोन वेल्डीग करण्यासाठी वापरण्यात येणारे सिलेन्डर,पांढऱ्या बॉक्समध्ये असलेले गॅस कटर,एक रबर पाईप,एक रेग्युलेटर,दोन चाकु ,गाडीची कागदपत्रे तसेच ३ मोबाईल हॅण्डसेट असा मिळून ६ लाख २० हजार ६०० रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.दरम्यान,त्यांना विटा पोलीस ठाण्यात आणण्यात आले.तिथे प्राथमिक चौकशी करून त्यांना करमाळा पोलिसाच्या स्वाधीन करण्यात आल्याचे पोलीस निरीक्षक डोके यांनी सांगितले.









