शहरातील सीएससी चालकाचा व्हिडिओ व्हायरल : प्रशासनाकडून कारवाईची मागणी
बेळगाव : सरकारने सर्वसामान्यांच्या कल्याणासाठी विविध योजना सुरू केल्या खऱ्या. परंतु, या योजनांसाठी लागणाऱ्या कागदपत्रांसाठी भरमसाट आर्थिक लूट करणाऱ्यांची संख्या वाढली आहे. शनिवार खूट, कचेरी रोड कॉर्नरवरील एका सीएससी सेंटरवर आधारकार्ड अपडेट करण्यासाठी तब्बल 350 रुपये वसूल केले जात असल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला असून यावर जिल्हा प्रशासन कोणती कारवाई करणार? असा प्रश्न विचारला जात आहे. गृहज्योती, गृहलक्ष्मी, अन्नभाग्य योजनांसाठी आधारकार्ड, रेशनकार्ड अपडेट असणे आवश्यक आहे. काहीजणांच्या आधारकार्डवर नाव, मोबाईल क्रमांक, जन्म तारीख, पत्ता चुकीचा आहे. त्यामुळे तो बदलून घेण्यासाठी नागरिकांची धावपळ सुरू आहे. रेशनकार्डवरील व्यक्ती मृत असेल तर तिचे नाव कमी करण्यासाठी गर्दी होत आहे. याचाच फायदा काही सीएससी सेंटरकडून उचलला जात आहे. आठवडाभरापूर्वी जिल्हाधिकारी नितेश पाटील यांनी अधिक पैसे वसूल करणाऱ्या सीएससी सेंटरवर कारवाई केली होती. परंतु, बेळगाव शहरात अद्याप बऱ्याच सीएससी सेंटरवर अतिरिक्त पैसे घेऊन सेवा दिली जात आहे. कचेरी रोड कॉर्नरवर असणाऱ्या सीएससी सेंटरमध्ये आधारकार्ड अपडेटसाठी एक व्यक्ती विचारणा करत होती. त्या व्यक्तीला आधार अपडेटसाठी 350 रुपये घेतले जात असल्याचे सांगण्यात आल्याचा व्हिडिओ सध्या व्हायरल झाला आहे. तक्रारदार व्यक्तीने जिल्हाधिकाऱ्यांना हा व्हिडिओ पाठविला असून संबंधितांवर कारवाई करावी, अशी मागणी केली आहे. केवळ आधारकार्डच नाही तर रेशनकार्डमधील नाव कमी करण्यासाठीही पैसे घेतले जात असल्याची बाब समोर आली आहे. त्यामुळे जिल्हा प्रशासनाने यामध्ये लक्ष घालून संबंधितांवर कडक कारवाई करणे गरजेचे आहे.
असा केला जातो गोलमाल
आधार अपडेटसाठी बेळगाव वन, पोस्ट ऑफिस, बँका, ग्रामवन, कर्नाटक वन या व्यतिरिक्त कोणत्याही सीएससी सेंटरला परवानगी नाही. परंतु, यापैकी एकाचा आयडी वापरून आधार अपडेट केले जात आहे. याचबरोबर बँका, पोस्ट ऑफिस, ग्रामवन, बेळगाव वनमधील काही कर्मचाऱ्यांचे सीएससी सेंटरवाल्यांशी लागेबांधे असून त्यांच्यामार्फत हे काम केले जात आहे. त्यामुळे सीएससी सेंटरवाले कमाईतील अर्धी रक्कम त्या कर्मचाऱ्यांना देत असल्याची माहितीही उपलब्ध झाली आहे.









