प्रतिनिधी/ बेंगळूर
उडुपीतील एका महाविद्यालयातील विद्यार्थिनीच्या आक्षेपार्ह व्हिडिओ प्रकरणाचा तपास राज्य सरकारने सीआयडीकडे सोपविला आहे. सोमवारी गृहखात्याने यासंबंधीचा अधिकृत आदेश जारी केला आहे.
उडुपीतील एका वैद्यकीय महाविद्यालयातील स्वच्छतागृहात एका विद्यार्थिनीचा तिच्याच सहकाऱ्यांनी व्हिडिओ तयार केला होता. या प्रकरणावरून खळबळ माजली होती. भाजपने या प्रकरणावरून काँग्रेस सरकारवर हल्लाबोल करत एनआयएमार्फत चौकशी करावी, अशी मागणी केली होती. तसेच अभाविप, भाजप आणि काही हिंदुत्ववादी संघटनांनी राज्यभरात निदर्शने केली होती. तसेच एसआयटीमार्फत चौकशीचे आदेश राज्यपालांनी सरकारला द्यावेत, अशी मागणी करण्यात आली होती.
दरम्यान, या प्रकरणी 18 जुलै रोजी पोलिसांनी सुमोटो तक्रार दाखल केली. उडुपी जिल्हा पोलिसांमार्फत चौकशी करण्यात आली. आरोप असणाऱ्या विद्यार्थिनी अन्य धर्माच्या असून त्यांनी कारस्थान रचून एका विद्यार्थिनीचा व्हिडिओ तयार केला. हा व्हिडिओ इतरांना शेअर केल्याचा आरोप आहे. आरोप होताच महाविद्यालय व्यवस्थापनाने आरोप असणाऱ्या तीन विद्यार्थिनींना निलंबित केले होते. आता सरकारने हे प्रकरण सीआयडीकडे सोपविण्याचा निर्णय घेतला आहे.