पुणे / प्रतिनिधी :
शिक्षण हक्क कायद्याअंतर्गत (आरटीई) खासगी शाळांतील 25 टक्के राखीव जागांवरील प्रवेश प्रक्रियेत यंदा 19 हजार 394 जागा रिक्त राहिल्या आहेत.
प्राथमिक शिक्षण संचालनालयातर्फे आरटीई प्रवेश प्रक्रिया राबवण्यात येते. प्रवेश प्रक्रियेद्वारे नियमित प्रवेश जाहीर झालेले विद्यार्थी आणि प्रतीक्षा यादीतील विद्यार्थी अशा एकूण 82 हजार 453 विद्यार्थ्यांनी प्रवेश निश्चित केला आहे. यंदा 8 हजार 823 शाळांतील 1 लाख 1 हजार 846 जागा प्रवेशासाठी उपलब्ध आहेत. त्यासाठी एकूण 3 लाख 64 हजार 413 अर्ज दाखल झाले. प्रवेशासाठीच्या सोडतीतून 94 हजार 700 नियमित प्रवेश जाहीर करण्यात आले. नियमित विद्यार्थ्यांचे प्रवेश पूर्ण झाल्यानंतर प्रतीक्षा यादीतील विद्यार्थ्यांसाठी तीन फेऱ्या राबवण्यात आल्या. त्यात पहिल्या फेरीत 13 हजार 660, दुसऱ्या फेरीत 3 हजार 583, तिसऱ्या फेरीत एक हजार 259 आणि चौथ्या फेरीत 18 विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला. त्यामुळे एकूण उपलब्ध जागांपैकी 19 हजार 394 जागा रिक्त राहिल्याचे संकेतस्थळावरील आकडेवारीवरून दिसून आले आहे.