संग्राम काटकर : कोल्हापूर
अंबाबाई मंदिरातील दुरवस्थेत असलेल्या गरूडमंडपाच्या नुतनीकरणाचे काम केव्हा होईल तेव्हा होईल, त्यात आम्ही पडणार नाही. असे सांगतानाच यंदाचा 45 दिवसांवर आलेला गणेशोत्सव गरूडमंडपातच साजरा कऊन गणेशमूर्ती प्रतिष्ठापना करण्यावर श्री महालक्ष्मी भक्त मंडळ ठाम असल्याचे संकेत दिले आहेत. मंडपातील राजसदरेवरच गणेशमूर्तीची प्रतिष्ठापना करण्यामागे तब्बल 47 वर्षांची मोठी परंपरा आहे. ही परंपरा आम्ही मोडू शकत नाही, असे मंडळाचे म्हणणे आहे. मंडपातच गणेशमूर्तीची प्रतिष्ठापना करण्यास परवानगी मिळावी, अशा आशयाचे पत्रही मंडळाने पश्चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समितीला दिले आहे.
गेल्या वर्षभरापूर्वी अंबाबाई मंदिरालगतच्या धार्मिक अधिष्ठान लाभलेला गरूडमंडप खचत असल्याचे देवस्थान समितीच्या निदर्शनास आले. मंडपाचा डोलारा पेलणारे खांबही सडल्याचे दिसले. मंडपाच्या छताचा काही भाग निसटला आहे. भविष्यात काही अघटीक घडू नये म्हणून 8 महिन्यापूर्वी मंडपाच्या नूतनीकरणाचा निर्णय घेतला. राज्य पुरातत्व व वस्तू संग्रहालयालयाकडे मंडप नूतनीकरणाचा प्रस्तावही दिला. जंगलातून टिकाऊ लाकडू आणून नुतनीकरण सुऊ करण्याचे ही ठरवले. परंतू अपेक्षेप्रमाणे कृती न झाल्याने मंडप वर्षभरापूर्वी ज्या दुरवस्थेत होता त्याच दुरवस्थेत आजही आहे. मंडप कोसळू नये म्हणून चार खांबांना दगड व लोखंडी पटट्यांचा सपोर्टही दिला आहे.
पावसाळा संपून जोपर्यंत नुतनीकरणाला सुऊवात होणार नाही, तोपर्यंत खांबांना सपोर्ट हा राहणारच आहे. त्यामुळे परंपरेनुसार यंदाच्या गणेशोत्सवात गरूडमंडपामध्ये महालक्ष्मी भक्त मंडळाकडून गणेशमूर्ती प्रतिष्ठापना केली जाणार की नाही, याकडे कोल्हापूरकरांच लक्ष आहे. शिवाय दुरवस्थेतच असलेल्या मंडपातच गणेशमूर्तीची प्रतिष्ठापना करण्याचे मंडळाने ठरवले आहे. मंडपातच गणेशमूर्तीची प्रतिष्ठापना करण्यामागे मोठी परंपरा आहे. 1890 साली (कै.) शंकरराव मेवेकरी यांनी मित्रमंडळींच्या संगतीने श्री महालक्ष्मी गणेश भक्त मंडळाची स्थापना कऊन अंबाबाई मंदिरात गणेशोत्सव साजरा करण्याची परंपरा सुऊ केली. गणेशमूर्तीची प्रतिष्ठापना मंदिरातील अंबाबाईच्या खजिन्यावर केली जाऊ लागली. त्यामुळे गणेशमूर्तीला खजिन्यावरील गणपती असे संबोधले गेले.
कालांतराने शंकरराव मेवेकरींचा वारसा (कै.) अनंत मेवेकरी व (कै.) कै. विश्वनाथ रंगोबा ऊर्फ मामा बावडेकर यांनी पुढे सुऊ ठेवला. 1976 साली अनंत मेवेकरी यांनी अंबाबाई व भाविकांची सेवा करण्यासाठी महालक्ष्मी भक्त मंडळाची स्थापना केली. याचकाळात श्री महालक्ष्मी गणेश भक्त मंडळ श्री महालक्ष्मी भक्त मंडळात विलीन झाले. तसेच अंबाबाई मंदिरातील खजिन्यावरच्या गणेशमूर्तीची गरूडमंडपातील सदरेवर प्रतिष्ठापना केली जाऊ लागली. तेव्हापासून आजतागायत सदरेवरच गणेशमूर्तीची प्रतिष्ठापना केली जात आहे. उत्सव काळात काही लाखांच्या घरात भाविक गरूडमंडपात जाऊन गणेशमूर्तीचे दर्शन घेत असतात. अंबाबाई मंदिरात आठवड्याच्या प्रत्येक शुक्रवारी पालखी सोहळा साजरा होतो. पालखी सोहळ्यादरम्यान काही वेळ अंबाबाईच्या उत्सवमूर्तीला गरूडमंडपातील सदरेवर विराजमान केले जाते. मात्र गणेशोत्सव काळात मंडपातील सदरेवर गणेशमूर्तीची प्रतिष्ठापना होत असल्याने येणाऱ्या शुक्रवारी साजरा होणाऱ्या पालखी सोहळ्यादरम्यान अंबाबाईच्या उत्सवमूर्तीला गणेशमूर्तीच्या मागील बाजूस मानाने विराजमान केली जाते. अशी सगळी धार्मिक परंपरा असताना 45 दिवसांवर आलेला गणेशोत्सव हा गरूडमंडपाऐवजी अन्यत्र साजरा करण्याच्या मनस्थितीत महालक्ष्मी भक्त मंडळ तयार नाही. शिवाय परंपरा मोडली जाऊ नये म्हणून महालक्ष्मी भक्त मंडळाने गरूडमंडपात गणेशमूर्तीची प्रतिष्ठापना करण्यास देवस्थान समितीकडे परवानगी मागितली आहे. त्यामुळे समितीच्या उत्तराची मंडळाला आता प्रतिक्षा आहे.