ऑनलाईन टीम / तरुण भारत :
मुंबईच्या लोकल ट्रेनमध्ये साखळी बॉम्बस्फोट करणार असल्याची धमकी मुंबई पोलिसांना फोनवरुन देण्यात आली. पोलिसांनी तात्काळ फोन लोकेशन ट्रेस करत धमकी देणाऱ्या व्यक्तीला अवघ्या दोन तासात अटक केली. त्यानंतर हा फेक कॉल असल्याचे स्पष्ट झालं.
मुंबई पोलिसांच्या कंट्रोल रूमला आज सकाळी धमकीचा फोन आला. फोनवरील व्यक्तीने मुंबईतील लोकलमध्ये बॉम्ब ठेवला असून, साखळी बॉम्बस्फोट करणार असल्याचे सांगितले. कंट्रोल रुममध्ये असलेल्या महिला पोलीस अधिकाऱ्याने कोणती ट्रेन, बॉम्ब कुठे ठेवला आहे, अशी माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न केला. मात्र, समोरुन बोलणाऱ्या व्यक्तीने उत्तर दिले नाही. त्यानंतर पोलिसांनी तात्काळ फोन लोकेशन ट्रेस करत धमकी देणाऱ्या व्यक्तीला अवघ्या दोन तासात अटक केली.
अशोक मुखिया (वय 25) असे अटक करण्यात आलेल्या व्यक्तीचे नाव आहे. विलेपार्लेच्या नेहरूनगर परिसरातून जूहू पोलिसांनी त्याला अटक केली. मुखिया हा मूळचा बिहारच्या सीतामढी जिल्ह्यातील रहिवासी आहे. तो सध्या मुंबईतील एका हॉटेलमध्ये हेल्पर म्हणून काम करत होता. जुहू पोलीस यासंदर्भात अधिक तपास करत आहेत.








