जागतिक तिरंदाजीत गोल्ड : वयाच्या 17 व्या वर्षी सुवर्ण जिंकणारी पहिली महिला तिरंदाज
वृत्तसंस्था/ बर्लिन, जर्मनी
राजधानी साताऱ्याच्या आदिती स्वामीने जागतिक तिरंदाजी स्पर्धेत कंपाऊंड प्रकारात वैयक्तिक सुवर्ण जिंकत इतिहास रचला आहे. विशेष म्हणजे, वयाच्या 17 व्या वर्षी आदितीने मिळवलेले यश देशाच्या इतिहासातील सर्वात मोठी कामगिरी ठरली आहे. अंतिम फेरीत तिने दोन वेळची विश्वचॅम्पियन मेक्सिकोच्या आंद्रिया बसेराचा 149-147 असा पराभव केला. या यशासह अदिती जागतिक चॅम्पियनशिपच्या एकाच मोसमात दोन विजेतेपद पटकावणारी जगातील पहिली तिरंदाज ठरली आहे. अदिती 18 वर्षांखालील (कॅडेट) प्रकारातही विश्वविजेती आहे.
जर्मनीची राजधानी बर्लिन येथे सुरु असलेल्या जागतिक तिरंदाजी चॅम्पियनशिपमधील हे भारताचे दुसरे सुवर्णपदक ठरले आहे. शुक्रवारी भारतीय महिला कंपाऊंड संघाने मेक्सिकोला 235-229 असे पराभूत करत पहिलेवाहिले सुवर्णपदक जिंकले होते. भारतीय संघात आदिती स्वामी, ज्योती सुरेखा व परनीत कौर यांचा समावेश होता. यानंतर दुसऱ्या दिवशी आदितीने कंपाऊंड प्रकारात वैयक्तिक सुवर्ण जिंकण्याची कामगिरी केली आहे. याशिवाय, भारताच्या ज्योती सुरेखाने या प्रकारात कांस्यपदक जिंकले. विशेष म्हणजे, या स्पर्धेतील भारताची ही आतापर्यंतची सर्वोत्तम कामगिरी ठरली आहे.
आदितीची ऐतिहासिक कामगिरी
विशेष म्हणजे, अदितीने अंतिम सामन्यात शानदार कामगिरी साकारली. आदितीने पाच सेटच्या अंतिम सामन्यात 9 गुणांवर फक्त एक बाण मारला. उर्वरित सर्व बाणांनी लक्ष्य गाठले आणि प्रत्येकी 10 गुण मिळवले. आदितीने पहिल्या सेटमध्ये तीन परफेक्ट 10 शॉट्स मारून 30 गुण मिळवले, तर मेक्सिकोच्या आंद्रियाने 29 गुण मिळवले. पहिल्या सेटमध्ये धमाकेदार सुरुवात केल्यानंतर अदितीने दुसऱ्या, तिसऱ्या आणि चौथ्या सेटमध्येही अचूक लक्ष्य साधत 10 गुण मिळवले. शेवटच्या सेटच्या पहिल्या बाणाने 9 गुण मिळवत तिने 150 पैकी 149 गुणाची कमाई केली. याचवेळी, दोन वेळची जगज्जेती आंद्रिया बसेराने पहिल्या सेटमध्ये एका गुणाने पिछाडीवर पडल्यानंतर दुसऱ्या सेटमध्ये 30 गुणांची कमाई केली. तिसऱ्या आणि चौथ्या सेटमध्ये तिला 29 गुणांवर समाधान मानावे लागले. शेवटच्या आणि पाचव्या सेटमध्ये 30 गुण घेतल्यानंतरही तिला जेतेपदापासून वंचित रहावे लागले. 147 गुणासह तिला रौप्यपदकावर समाधान मानावे लागले.
तत्पूर्वी, आदितीने उपांत्य फेरीत भारताच्याच ज्योती सुरेखाला 143-145 असे पराभूत करत अंतिम फेरी गाठली होती. यानंतर ज्योतीने कांस्यपदकासाठीच्या लढतीत तुकीच्या इपेक तोमरुकला नमवत कांस्यपदक जिंकले. या कांस्यपदकासह ज्योतीच्या नावावर आठव्या जागतिक पदकाची नोंद झाली आहे.
जागतिक तिरंदाजीत भारताला आतापर्यंत 13 पदके
दर दोन वर्षांनी आयोजित केल्या जाणाऱ्या या स्पर्धेत भारतीय संघाने आतापर्यंत 13 पदके मिळवली आहेत. यामध्ये दोन सुवर्ण, नऊ रौप्य व दोन कांस्यपदकांचा समावेश आहे. विशेष म्हणजे, यंदाच्या या स्पर्धेत भारताचे प्रथमच दोन सुवर्णपदक जिंकत आतापर्यंतची सर्वोत्तम कामगिरी साकारली आहे.
माझ्या आतापर्यंतच्या कारकिर्दीतील ही सर्वोत्तम कामगिरी आहे. अंतिम लढतीत मेक्सिकोच्या आंद्रियाविरुद्धची लढत ही अविस्मरणीय होती. आता, आगामी आशियाई स्पर्धेत सुवर्ण जिंकण्याचे ध्येय आहे.
आदिती गोपीचंद स्वामी, महिला तिरंदाज
जागतिक तिरंदाजी स्पर्धेत भारताने दोन सुवर्णपदके जिंकण्याचा पराक्रम केला आहे. हा संपूर्ण भारतीयांसाठी अभिमानाचा क्षण आहे. कठोर परिश्रमाच्या जोरावर भारतीय तिरंदाजांनी हे यश मिळवले आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी
प्रचंड मेहनतीमुळे यश
आदितीने प्रचंड मेहनत घेत जागतिक सुवर्णपदक मिळवलं आहे. आदितीला केलेले मार्गदर्शन व सांगितलेल्या सूचनांचे तंतोतंत पालन केले. आदितीने मिळवलेले यश सर्वांसाठी अभिमानाची गोष्ट आहे.
प्रवीण सावंत, आदितीचे प्रशिक्षक