पुणे / प्रतिनिधी :
पुण्यातील कोरेगावपार्क येथील हॉटेलमध्ये जेवण आटोपून घरी परण्यासाठी निघालेल्या 37 वर्षीय व्यावसायिकाच्या कारवर चिठ्ठी चिकटवित 10 लाख रुपयांच्या खंडणीची मागणी करणाऱ्या आरोपीला पकडण्यात पोलिसांना यश आले आहे. सोलापूर जिल्हय़ामधील माळशिरस तालुक्यातील वेळापूर येथून स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या या तरुणास अटक करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी शनिवारी दिली.
श्रीनाथ शेडगे असे अटक करण्यात आलेल्या तरुणाचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार व्यवसायिक हे मूळचे बारामती येथील रहिवासी आहेत. ते हॉटेल व्यावसायिक असून, त्यांचा जमीन-खरेदी विक्रीचाही व्यवसाय आहे. 31 जुलै रोजी रात्री साडे आठ वाजता त्यांचा मित्र पंकज निकुडे यांच्यासोबत ते कोरेगावपार्क येथील लेन नंबर 7 येथील डेझर्ट वॉटर हॉटेल येथे जेवण करण्यासाठी गेले होते. त्यावेळी शेडगे यांने त्यांच्या कारवर चिठ्ठी चिकटवली. त्यामध्ये त्यात ‘मला दहा लाखांची गरज आहे. मला पैसे दिले नाही व पोलिसांना सांगितले, तर तुझ्या कुटुंबातील एक-एक व्यक्तीला मारून टाकेन,’ अशी धमकी देण्यात आली होती. याबाबत व्यावसायिकाने पोलिसांकडे तक्रार दाखल केली होती. तपासादरम्यान, पोलिसांनी माग काढत शेडगे याला अटक केली.
आरोपी श्रीनाथ शेडगे याचे आई-वडील गावी शेती करतात. मागील आठ महिन्यांपासून तो पुण्यात स्पर्धा परीक्षा तयारी करण्यासाठी आला होता. दरवेळी परीक्षा थोडय़ा मार्काने हुकत असल्याने तो कर्जबाजारी झाला होता. त्याने झोमॅटोमध्ये काम सुरू केले होते. तसेच शेअर मार्केटमध्ये पैसे गुंतवल्यावरही त्याला नुकसान झाले होते. त्यामुळे त्याने सीआयडी मालिका पाहून प्लॅन रचला होता. पोलीस याप्रकरणी अधिक तपास करत आहेत.








