युवा रक्तदाता संघटनेचे अध्यक्ष देव्या सूर्याजी यांचे प्रतिपादन
ओटवणे प्रतिनिधी
जिल्ह्यातील दृष्टिहीन व होतकरू व्यक्तींना रोजगाराच्या तसेच आत्मनिर्भर बनण्यासाठी राष्ट्रीय दृष्टीहीन संघ करीत असलेले प्रयत्न कौतुकास्पद आहे. यासाठी युवा रक्तदाता संघटनेच्यावतीने सर्वतोपरी सहकार्य केले जाईल अशी ग्वाही युवा रक्तदाता संघटनेचे अध्यक्ष देव्या सूर्याजी यांनी दिली.
राष्ट्रीय दृष्टीहीन संघाच्या सावंतवाडीत येथील काझी शहाबुद्दीन हॉल येथे आयोजित करण्यात आलेल्या महाराष्ट्र राज्यातील कोकण विभागीय वर्धापन दिन सोहळ्यात देव्या सुर्याजी बोलत होते. यावेळी व्यासपिठावर दृष्टीहीन संघटनेचे मुंबई अध्यक्ष बी डी पवार, सामाजिक बांधिलकीचे रवी जाधव, कल्पना बांदेकर, दृष्टीहीन संघटनेचे अध्यक्ष बाबुराव गावडे, सचिव शेखर आळवे, प्रतीक बांदेकर, प्रथमेश प्रभू, सुरज मठकर आदी उपस्थित होते.
यावेळी कल्पना बांदेकर यांनी जिल्ह्यातील दृष्टिहीन व्यक्तींना रोजगार निर्मितीसाठी वेगवेगळे व्यवसाय सुरू करण्याचे संघटनेचे प्रयत्न कौतुकास्पद असल्याचे सांगुन यातून संघटनेच्या दृष्टीहीन व्यक्तींना रोजगार मिळेल असा विश्वास व्यक्त केला. यावेळी रवी जाधव यांनी सामाजिक बांधिलकीच्या माध्यमातून दृष्टिहीन व्यक्तींसाठी रात्रंदिवस काम करण्यासाठी सामाजिक बांधिलकीचे कार्यकर्ते सदैव तत्पर असल्याची ग्वाही दिली.
यावेळी कल्पना बांदेकर यांचा संघटनेच्यावतीने शाल व श्रीफळ देऊन सन्मान करण्यात आला. तसेच दृष्टीहीन व्यक्तींना बॅग व अन्य साहित्यांचे वितरण करण्यात आले. यावेळी राष्ट्रीय दृष्टीहीन संघ महाराष्ट्र विभागीय शाखेच्यावतीने दृष्टीहीन बांधवांचा सन्मान करत त्यांना भेटवस्तू देण्यात आल्या. यावेळी जिल्ह्यातील दृष्टिहीन बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.