रेसकोर्स परिसरात महिनाभर होती भीती : आधुनिक यंत्रणा राबवूनही बिबट्या निसटला
बेळगाव : जाधवनगर परिसरात एका गवंडी कामगारावर हल्ला करून तब्बल एक महिना शहरात दबा धरून बसलेल्या बिबट्यामुळे शहरवासीय धास्तीखाली वावरले होते. या घटनेला 5 ऑगस्ट रोजी वर्षपूर्ती होते. भर शहरात लपून बसलेल्या बिबट्याने सर्वसामान्यांबरोबर वनखात्याची झोप उडविली होती. अखेर बिबट्या वनखात्याच्या हातातून सहीसलामत सुटून गेला होता. जाधवनगर परिसरात 5 ऑगस्ट रोजी एका गवंड्यावर हल्ला करून रेसकोर्स परिसरात आसरा घेतला होता. बिबट्याच्या शोधासाठी संपूर्ण यंत्रणा जुंपण्यात आली होती. ट्रॅप कॅमेरे, श्वान, हत्ती आणि इतर आधुनिक तंत्राचा वापर झाला होता. मात्र सारी यंत्रणा निष्फळ ठरली होती. बाहेरून तज्ञ आणि प्रशिक्षक कर्मचाऱ्यांनादेखील पाचारण करण्यात आले होते. मात्र त्यांच्यादेखील हाती काहीच लागले नाही.
तब्बल 30 दिवस सारी यंत्रणा बिबट्याच्या मागावर होती. मात्र अखेर बिबट्याने या साऱ्यांना चकवा देऊन आपली सुटका केली. एका बिबट्याच्या शोधासाठी वनखात्याने लाखो रुपये खर्च केले होते. मात्र बिबट्या काही हाती लागला नाही. त्यामुळे सर्वांची दमछाक केलेल्या बिबट्याच्या आठवणी आजही सर्वसामान्य बेळगावकर आणि वनखात्याला ताज्या आहेत. रेसकोर्सच्या मैदानात वनखात्याची यंत्रणा तळ ठोकून होती. वनखात्याच्या कर्मचाऱ्यांसह पिंजरे, कॅमेरे, हत्ती आणि हाऊसहोंड जातीचे श्वान बिबट्याच्या शोधात होती. मात्र या साऱ्यांना अखेर शोध लागला नाही. तब्बल एक महिना दबा धरून बसलेल्या बिबट्यामुळे रेसकोर्सचा परिसर आणि आजूबाजूची वस्ती दहशतीखाली गेली होती. अखेर 31 ऑगस्ट रोजी कॉबिंग ऑपरेशन राबवून वनखात्याने बिबट्या शहरातून बाहेर गेल्याचे जाहीर केले.
बिबट्याच्या शोधासाठी सारी यंत्रणा
गतवर्षी आलेल्या बिबट्याच्या शोधासाठी सारी यंत्रणा राबविण्यात आली होती. कर्मचारी, कॅमेरे, पिंजरे, तैनात ठेवण्यात आले होते. मात्र बिबट्या हा प्राणी अधिक चपळ असल्याने तो निसटू शकतो. शिवाय शहरात आल्याने नागरिकांची काळजी घेणे देखील आवश्यक होते. बिबट्याला पकडण्यापेक्षा कोणावर हल्ला होऊ नये, याची काळजी घेतली गेली.
– शिवरुद्रप्पा कबाडगी (एसीएफ, वनखाते बेळगाव)









