वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
अखिल भारतीय फुटबॉल महासंघाने (एआयएफएफ) क्लिफर्ड मिरांडा यांची 23 वर्षांखालील भारतीय पुरुष फुटबॉल संघाच्या मुख्य प्रशिक्षकपदी नियुक्ती केली आहे. ‘एआयएफएफ’च्या तांत्रिक समितीने साहाय्यक प्रशिक्षक म्हणून नल्लाप्पन मोहनराज, गोलरक्षण प्रशिक्षक म्हणून रघुवीर खानवलकर आणि संघाचे फिटनेस प्रशिक्षक म्हणून गॅविन इलियास आरावजो यांच्या नियुक्तीची शिफारस केली आहे.
‘एआयएफएफ’ने ‘एएफसी’ 23 वर्षांखालील आशियाई चषक कतार पात्रता स्पर्धेसाठी 28 संभाव्य खेळाडूंची यादी जाहीर केली आहे. तांत्रिक समितीची बैठक व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे आय. एम. विजयन यांच्या अध्यक्षतेखाली झाली आणि त्यास पिंकी बोम्पल मगर, हरजिंदर सिंग, अरुण मल्होत्रा, क्लायमॅक्स लॉरेन्स, युजिनेसन लिंगडोह आणि ‘एआयएफएफ’ तांत्रिक संचालक सय्यद शबीर पाशा उपस्थित होते.
मिरांडा यांनी 2005 ते 2014 पर्यंत नऊ वर्षे मिडफिल्डर म्हणून भारताचे प्रतिनिधीत्व केले. ते दोन सॅफ विजेतेपदे, दोन नेहरू चषक किताब आणि एक एएफसी चॅलेंज कप जिंकणाऱ्या संघाचे भाग राहिले. क्लबस्तरावर ते पाचवेळा एनएफएल/आय-लीग विजेते राहिलेल्या गोव्याच्या धेंपो संघातून खेळले होते. मिरांडा यांच्याकडे प्रमुख विजेतेपद मिळविणाऱ्या ‘आयएसएल’ संघाचे पहिले भारतीय प्रशिक्षक ठरण्याचा मान जातो. त्यावेळी त्यांच्या मार्गदर्शनाखालील ओडिशा फुटबॉल क्लबने केरळमध्ये सुपर कप जिंकला होता.
एएफसी 23 वर्षांखालील आशियाई चषक कतार 2024 पात्रता स्पर्धा 6 ते 12 सप्टेंबरदरम्यान चीनमधील डालियान येथे होणार आहे. पुढील वर्षी पॅरिस येथे होणार असलेल्या ऑलिम्पिकमधील फुटबॉल स्पर्धेसाठीची पात्रता स्पर्धा म्हणूनही त्याला महत्त्व आहे. दरम्यान, 12 ऑगस्टपासून भुवनेश्वरमध्ये भारतीय संघाचे सराव शिबिर होणार आहे. सदर स्पर्धेच्या ‘जी’ गटात भारताचा यजमान चीन, मालदीव आणि संयुक्त अरब अमिरातसमवेत समावेश आहे.
संभाव्य खेळाडू : गोलरक्षक : सचिन सुरेश, हृतिक तिवारी, प्रभसुखन सिंग गिल, अर्श अन्वर शेख, बचावपटू : नरेंद्र गहलोत, हॉर्मिपम ऊईवा, विकास युम्नाम, हॅलेन नोंगटडू, संजीव स्टॅलिन, सुमित राठी, जितेंद्र सिंग, अब्दुल रबीह, मिडफिल्डर : थोयबा सिंग मोइरांगथेम, लालरिन्लियाना हानाम्ते, जितेश्वर सिंग युमखाईबाम, आयुष देव छेत्री, विबिन मोहनन, ब्रिसन देवबेन फर्नांडिस, अमरजित सिंग कियाम, आघाडीपटू : सौरव के, विक्रम प्रताप सिंग, पार्थिब गोगोई, रोहित दानू, निंनथोइंगांबा मीतेई खुमंथेम, गुरकिरत सिंग, आयुष छिकारा, शिवशक्ती नारायणन, सुहेल अहमद भट्ट.









