मंत्री के. एच. मुनियप्पा यांची माहिती : अन्नभाग्य योजनेंतर्गत ऑगस्टमध्येही पैसे
प्रतिनिधी/बेंगळूर
सप्टेंबर महिन्यापासून अन्नभाग्य योजनेंतर्गत अतिरिक्त 5 किलो तांदूळ वितरण केले जाणार आहे. बीपीएल रेशनकार्डधारक कुटुंबांना वितरित करण्यासाठी अतिरिक्त तांदूळ उपलब्ध न झाल्याने प्रतिव्यक्ती 5 किलो तांदळाऐवजी 170 रुपये बँक खात्यावर जमा केले जात आहेत. केवळ दोन महिन्यांसाठीच जमा केले जात आहेत, अशी माहिती अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री के. एम. मुनियप्पा यांनी दिली.
विधानसौध येथे शुक्रवारी पत्रकार परिषदेत ते बोलत होते. अन्नभाग्य योजनेसाठी आवश्यक असणारा अतिरिक्त तांदूळ खरेदीसाठी आंध्रप्रदेश, तेलंगणासह विविध राज्यांच्या अन्न-नागरी पुरवठा मंत्र्यांशी चर्चा केली आहे. केंद्र सरकारच्या आहार निगमच्या दरानुसार प्रतिकिलो 34 रुपयेप्रमाणे तांदूळ खरेदीसाठी चर्चा सुरू आहे. या दरानुसार तांदूळ पुरवठा करण्यास या राज्यांनी संमती दर्शविली तर सप्टेंबर महिन्यापासून लाभार्थींच्या खात्यावर पैसे जमा करणे बंद करून तांदूळ वितरण केले जाईल. आठवडाभरात तांदूळ खरेदीसंबंधी प्रक्रिया पूर्ण केली जाईल, असे त्यांनी सांगितले.
केंद्र सरकारने अतिरिक्त तांदूळ पुरवठा करण्यास नकार दिल्याने तात्पुरती व्यवस्था म्हणून बीपीएल कुटुंबांना प्रतिव्यक्ती 170 रु. जमा केले जात आहे. राज्य सरकारने यापूर्वी तेलंगणा, आंध्रप्रदेश व इतर राज्यांकडून तांदूळ खरेदीचा प्रयत्न केला होता. मात्र, दर अधिक असल्याने अतिरिक्त तांदूळ खरेदी शक्य झाली नव्हती. आता ही राज्ये केंद्र सरकारच्या दरानुसार कर्नाटकाला प्रतिकिलो 34 रु. दराने तांदूळ पुरवठा करण्यास तयार झाली आहेत. त्यामुळे खरेदीबाबत चर्चा सुरू आहे. आठवडाभरात चर्चा पूर्ण करून बीपीएल रेशनकार्डधारकांना प्रतिव्यिक्ती एकूण 10 किलो तांदूळ वितरण करेल, असे त्यांनी सांगितले.
अर्ज केलेल्यांना लवकरच रेशनकार्ड वितरण
राज्यात नव्या रेशनकार्डांसाठी अर्ज केलेल्यांना विधानसभा निवडणूक आचारसंहितेमुळे अद्याप कार्डवितरण केलेले नाही. आता रेशनकार्डे वितरीत करण्याची सूचना अन्न-नागरी पुरवठा खात्याच्या अधिकाऱ्यांना देण्यात आली आहे. त्याचप्रमाणे नव्या रेशन कार्डांसाठी लवकरच अर्ज स्वीकारण्यासही प्रारंभ केला जाईल, अशी माहिती मंत्री के. एच. मुनियप्पा यांनी दिली.
बँक खाते नसणाऱ्यांना बाकी रक्कम नाही
अन्नभाग्य योजनेंतर्गत बँक खाते नसणाऱ्या बीपीएल कार्डधारकांना रोख हस्तांतरणाची बाकी रक्कम देणे शक्य नाही. बँक खाते उघडल्याच्या तारखेपासून लाभार्थींच्या खात्यावर पैसे जमा केले जाईल, अशी माहितीही मंत्री मुनियप्पा यांनी दिली. आतापर्यंत 1 कोटी कुटुंबांच्या खात्यावर अतिरिक्त तांदळाऐवजी 566 कोटी रु. जमा केले आहेत. बाकी कुटुंबांना बँक खाते आणि आधार लिंक केल्यानंतर पैसे दिले जातील. मात्र, त्यांना मागील महिन्यातील बाकी रक्कम दिली जाणार नाही. ज्या महिन्यापासून बँक खाते क्रमांक दिले जाईल, त्या महिन्यापासून त्यांना पैसे दिले जातील. 28 लाख कुटुंबांच्या बँक खात्याला आधार लिंक नसल्याने त्यांच्या खात्यावर पैसे जमा केलेले नाहीत. बँक खाते नसणाऱ्या बीपीएल कुटुंबांना खाते उघडण्यासाठी मदत केली जात आहे. रेशन दुकान असलेल्या भागात कौंटर सुरू करून बँक खाते उघडण्यास साहाय्य केले जाईल. आतापर्यंत 1,19,502 बीपीएल कुटुंबांनी नवी खाती उघडली आहेत, अशी माहिती मुनियप्पा यांनी दिली.
कार असणाऱ्यांची बीपीएल कार्डे रद्द करणार
स्वत:ची कार असणारी कुटुंबे बीपीएल रेशनकार्डासाठी पात्र नाहीत. त्यामुळे स्वत:ची कार असणाऱ्या कुटुंबांजवळ बीपीएल रेशनकार्डे असतील तर तरी रद्द केली जाणार आहेत, अशी माहिती अन्न आणि नागरी पुरवठामंत्री के. एच. मुनियप्पा यांनी दिली. बीपीएल कुटुंबांजवळ पांढऱ्या रंगाची नंबरप्लेटची कार असेल तर त्यांचे रेशनकार्ड रद्द केले जाईल. तसेच पिवळ्या नंबरप्लेटची कार असेल तर अशा कुटुंबांचे बीपीएल रेशनकार्ड मागे घेण्याचा विचार सुरू आहे, असेही त्यांनी सांगितले.









