गोपनीय माहिती पुरविल्याचा आरोप : नौदल तळ सुरक्षा, शस्त्रास्त्रांची माहिती ड्रॅगनकडे
वृत्तसंस्था/ वॉशिंग्टन
चीनला देशाशी संबंधित गोपनीय माहिती पुरविल्याप्रकरणी अमेरिकेने नौदलाच्या 2 अधिकाऱ्यांना अटक केली आहे. यातील एका अधिकाऱ्याचे नाव वेनहेंग झाओ असून त्याने सुमारे 12.5 लाख रुपयांच्या बदल्यात अमेरिकेच्या सैन्याशी निगडित अनेक संवेदनशील छायाचित्रे अन् व्हिडिओ चीनला पुरविले होते. तर दुसऱ्या अधिकाऱ्याचे नाव जिनचाओ वेई असून त्याने हजारो डॉलर्सच्या बदल्यात राष्ट्रीय सुरक्षेशी निगडित माहिती चीनला पुरविण्याचा कट रचला होता.
झाओने स्वत:च्या चिनी साथीदारांना हिंद-प्रशांतमधील अमेरिकेचा सैन्याभ्यास, इलेक्ट्रिकल डायग्राम, जपानमधील अमेरिकेच्या सैन्य तळावरील रडार सिस्टीमचे ब्ल्यू प्रिंट्स, लॉस एंजिलिसनजीकच्या अमेरिकेच्या नौदल तळाशी निगडित सुरक्षा तपशील पुरविल्याचा आरोप आहे.
युद्धनौकांच्या पॉवर स्ट्रक्चरची माहिती पुरविली
सॅन दिएगोमध्ये अमेरिकन युद्धनौका युएसएस एसेक्सवर काम करताना वेईने चीनला अमेरिकेच्या युद्धनौकांशी निगडित 30 तांत्रिक मॅन्युअल्ससोबत त्याचे पॉवर स्ट्रक्चर आणि शस्त्रास्त्रांशी निगडित माहिती पुरविली आहे. या युद्धनौकांची कमजोरी कोणती हे देखील त्याने चीनला सांगितले आहे. हा प्रकार उघडकीस आल्यावर अमेरिकेच्या अधिकाऱ्यांनी चीनच्या या हेरगिरी मोहिमेची निंदा केली आहे.
20 वर्षांहून अधिक शिक्षा शक्य
चीन अमेरिकेसाठी सर्वात मोठा धोका असून तो कदाचित अनेक पिढ्यांपर्यंत शत्रू राहणार आहे. चीन कुठल्याही स्थितीत अमेरिकेला लक्ष्य करणे बंद करणार नाही. जगातील एकमेव महासत्ता होण्याचे चीनचे उद्दिष्ट आहे. दोन्ही आरोपींवर चीनसाठी हेरगिरी करण्याचा आरोप असून दोषी ठरल्यास त्यांना 20 वर्षांपेक्षा अधिक कालावधीची शिक्षा होऊ शकते असे एफबीआयचे अधिकारी स्टेसी मोय यांनी सांगितले आहे. एका आरोपीला अलिकडेच अमेरिकेचे नागरिकत्व मिळाले होते. तर दुसऱ्या आरोपीने नागरिकत्वासाठी अर्ज केला होता.









