वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
खाद्यपुरवठा करणारी कंपनी झोमॅटोने आर्थिक वर्ष 2024 च्या पहिल्या तिमाहीत दोन कोटी रुपयांचा नफाकमाई केली आहे. कंपनीची स्थापना 15 वर्षांपूर्वी 2008 मध्ये झाली त्यानंतर पहिल्यांदाच कंपनीने नफा कमाई केली असल्याची माहिती आहे. दिर्घकालावधीनंतर ही कामगिरी कंपनीने केली असल्याने विविध युजर्सनी काही गंमतीशीर प्रतिक्रीया पोस्ट केल्या असल्याचे दिसून येत आहे.
याबाबत एका यूजरने पोस्टमध्ये गंमतीने लिहिले की, ‘भाई, माझ्याकडून 2 कोटी घे, घरोघरी अन्न पोहोचवण्याची काय गरज होती.’ पेटीएमचे संस्थापक आणि सीईओ विजय शेखर शर्मा यांनी झोमॅटोच्या कार्याची दखल घेत त्यांच्या अविश्वसनीय प्रयत्नांची प्रशंसा केली. यासोबतच इतर लोकांनीही कंपनीचे अभिनंदन केले आहे.
झोमॅटोचे अभिनंदन करताना, केंद्रीय इलेक्ट्रॉनिक्स आणि आयटी राज्यमंत्री, राजीव चंद्रशेखर यांनी लिहिले, ‘हे सर्व गुंतवणूकदार आणि स्टार्टअपसाठी चांगले चिन्ह आहे. सर्व भारतीय टेक स्टार्टअप नफा कमावण्यासाठी काम करत आहेत. या पोस्टला उत्तर देताना दीपेंद्र म्हणाले- ‘खूप खूप धन्यवाद सर. आमचे उद्दिष्ट अधिक चांगल्या सेवा निर्माण करण्यासाठी नफा मिळवणे हे आहे, नफा कमावण्यासाठी सेवा तयार करणे नाही.’
जून तिमाहीचा महसूल 71 टक्क्यांनी वाढून 2,416 कोटी झाला. गेल्या वर्षीचा महसूल 1,414 कोटी रुपये होता. जूनच्या तिमाहीत कंपनीला 2 कोटी रुपयांचा नफा झाला आहे. कंपनीला वर्षभरापूर्वी आर्थिक वर्षामध्ये 186 कोटी रुपयांचा तोटा झाला होता.









