कोल्हापूर प्रतिनिधी
जिल्हा परिषदेत गेले अनेक वर्षापासून अनेक पदे रिक्त आहेत. 2019 मध्ये जाहीरात प्रसिद्ध करण्यात आली होती. मात्र रिक्त पदांची भरती झाली नाही. शनिवारी (5 रोजी) विविध विभागातील 728 पदांसाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली असून या महिन्यात भरती प्रक्रीया पार पडणार असल्याची माहिती जिल्हा परिषदेच्या सामान्य प्रशासन विभागाच्या उपमुख्य कार्यकारी अधिकारी मनिषा देसाई यांनी दिली.
महाराष्ट्र शासन, वित्त विभागाकडील शासन निर्णय 31 ऑक्टोंबर 2022 व महाराष्ट्र शासन, ग्रामविकास विभागाकडील शासन निर्णय 15 नोव्हेंबर 2022 अन्वये जिल्हा परिषदांतर्गत गट क मधील सर्व संवर्गाची (वाहन चालक व गट – ड संवर्गातील पदे वगळून) विविध विभागाकडील रिक्त पदे सरळसेवेने भरण्यासाठी मान्यता मिळालेली आहे. त्याची भरती प्रक्रीया सुरू झाली असून 19 सवंर्गातील सुमारे 728 पदे भरली जाणार आहेत. सदरची पदभरती आय.बी.पी.एस. कंपनीमार्फत ऑनलाईन परिक्षेद्वारे करणेत येणार आहे. इच्छुक पात्र उमेदवारांनी संकेतस्थळावर 25/08/2023 रोजी रात्री 23.59 वाजेपर्यंत पध्दतीने अर्ज करावा असे आवाहनही जिल्हा प्रशासनाने केले आहे. भरतीबाबत मदत कक्ष सुरू करण्यात आला असून सदर कक्ष सर्व कार्यालयीन कामकाजाच्या दिवशी कार्यालयीन वेळेत सुरु राहणार आहे. मदत कक्ष क्रमांक 0231-2655416 असा असून अडचण आलेस संपर्क साधावा असे आवाहनही करण्यात आले आहे.
या पदभरती अंतर्गत विस्तार अधिकारी, लघुलेखक, वरिष्ठ सहाय्यक, कनिष्ठ सहाय्यक, कनिष्ठ व वरिष्ठ लेखाधिकारी, ग्रामसेवक, विस्तार अधिकारी, कनिष्ठ अभियंता, कनिष्ठ आरेखक, कनिष्ठ यांत्रिकी, पशुधन पर्यवेक्षक, औषध निर्माता, पर्यवेक्षिका, आरोग्य सेवक पुरुष व महिला, आदी पदांची भरती केली जाणार आहे.