प्रतिनिधी / मिरज
कर्जबाजारी मुलाच्या त्रासाला कंटाळून बापानेच मुलाचा क्रुरपणे खून करून कटरच्या साह्याने त्याच्या शरीराचे तुकडे केल्याची धक्कादायक घटना शुक्रवारी सकाळी सुभाषनगर हंडीफोड मळा येथे उघडकीस आली. रोहित राजेंद्र हांदिफोड (वय २९, रा. गणेश तलाव पाठीमागे, लक्षमी मंदिराजवळ मिरज) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. सदर तरुणाच्या मूतदेहाचे दोन तुकडे करून निम्मा भाग गणेश तलावात फेकून देण्यात आला आहे तर निम्मा भाग सुभाषनगर येथे स्वतःच्या प्लॉटमध्ये ठेवण्यात आला आहे. या खून प्रकरणानंतर संशयित बाप राजेंद्र याल्लाप्पा हंदिफोड हा स्वतःहून पोलिसात हजर झाल्यानंतर खुनाची ही घटना उघडकीस आली आहे. बापानेच मुलाची इतकी क्रूरपणे हत्या केल्याच्या घटनेने शहरात एकच खळबळ उडाली आहे.
गणेश तलावामध्ये खून झालेल्या तरुणाचे हात पाय आणि मुंडके फेकून दिल्याची शक्यता आहे. तर उर्वरित धड हे सुभाषनगर येथील हंडीफोड मळ्यात असलेल्या प्लॉटमध्ये ठेवण्यात आले आहे. घटनास्थळी पोलीस पंचनामा सुरू आहे. दरम्यान संबंधित मयत तरुण हा रेकॉर्ड वरील गुन्हेगार असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले आहे.
घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार, रोहित हंडीफोड हा गणेश तलाव पाठीमागे असलेल्या लक्ष्मी मंदिराजवळ राहण्यास होता. त्यांचा वडिलोपार्जित दूध विक्रीचा व्यवसाय आहे. अधून मधून तो दूध विक्री हे करत होता. मात्र गेल्या काही वर्षांपासून तो कर्जबाजारी बनल्याने घरात नेहमी वादावादी करत असे. यापूर्वी वडिलांसोबत त्याचे भांडण झाले होते. त्यानंतर संबंधित रोहित हंडीफोड याचा खून झाल्याचे उघडकीस आले.
वडील राजेंद्र यांनी मुलगा रोहित याच्या डोक्यात फावडा घालून खून केला. त्यानंतर कटरच्या साह्याने हात पाय आणि मुंडके कापून जवळ असलेल्या गणेश तलावात फेकून दिले. त्यानंतर उर्वरित मृतदेहाचे धड एका पोत्यात गुंडाळून सुभाषनगर येथील स्वतःच्या प्लॉटमध्ये आणून फेकले. असे प्राथमिक तपासातून समोर आले आहे. खुन करून संशयित बाप स्वतः पोलिसात हजर झाल्यानंतर खूनाची ही घटना समोर आली आहे. याबाबत अधिक तपास सुरू आहे.