प्रतिनिधी, खेड
मुंबई-गोवा महामार्गावरील भोस्ते घाटात गुरुवारी सायंकाळी 6.30 च्या सुमारास 12 चाकी कंटेनर व आयशर टेम्पो यांच्यात झालेल्या अपघातात केबिनमध्ये अडकलेल्या दोघांचे मृतदेह 3 तासांच्या अथक प्रयत्नाने मदतकर्त्यांच्या हाती लागले. मृत दोघेही अलिबागचे रहिवासी असल्याची माहिती समोर आली असून नावे समजू शकली नाहीत.तर एकास सुखरूप बाहेर काढण्यात यश आले. अपघातामुळे काही काळ वाहतुकीचा खोळंबा झाला.
मुंबई-गोवा महामार्गावरील भोस्ते घाटात 12 चाकी कंटेनर चालकाचे नियंत्रण सुटल्याने आयशर टेम्पोला दिलेल्या धडकेत कंटेनरही त्याच ठिकाणी कलंडला. अपघाताचे वृत्त कळताच पोलीस निरीक्षक नितीन भोयर व सहकारी तातडीने घटनास्थळी रवाना झाले. कशेडी येथील वाहतूक पोलीस मदत केंद्राचे अधिकारी व कर्मचारी,सुरज हंबीर तसेच मदत ग्रुपचे मनीष भोसले,अक्षय भोसले,अनिकेत पालांडे यांनी घटनास्थळी पोहचून मदतकार्य हाती घेतले.2 तासांच्या अथक प्रयत्नाने केबिनमध्ये अडकलेल्या एका प्रवाशास बाहेर काढण्यात आले. गंभीररित्या जखमी झालेल्या एकास तातडीने उपचारासाठी कळंबणी उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. तर अन्य दोघांचे मृतदेह हाती लागले.अपघातात अडकलेल्यांना बाहेर काढण्यासाठी तातडीने क्रेन तैनात करण्यात आली. या बाबतचा अधिक तपशील रात्री उशिरापर्यंत समजू शकला नाही.
भोस्ते घाटात अपघातांची मालिका सुरूच आहे. येथे सातत्याने घडणारे अपघात रोखण्यात यंत्रणांना अपयशच आले आहे. यामुळे वाहनचालकांची सुरक्षितता पुन्हा ऐरणीवर आली आहे. अपघात नियंत्रणात आणण्यासाठी राष्ट्रीय महामार्ग खात्याने केलेल्या विविध उपाययोजनांचा अवलंबही फोलच ठरला आहे. सतत अपघात घडत असतानाही राष्ट्रीय महामार्ग खाते मात्र अजूनही सुस्तच आहे. येथे मोठी दुर्घटना घडल्यानंतरच राष्ट्रीय महामार्ग खाते जागे होणार का,असा संतप्त सवालही उपस्थित केला जात आहे.









