वृत्तसंस्था /नवी दिल्ली
सध्या सुरू असलेल्या पावसाळी अधिवेशनात संसदेत सरकारच्या रणनीतीवर चर्चा करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नुकतीच सहकारी मंत्र्यांसोबत बैठक घेतली. या बैठकीत संरक्षणमंत्री राजनाथ सिंह, गृहमंत्री अमित शहा, प्रल्हाद जोशी, पियुष गोयल, अनुरागसिंह ठाकूर, नितीन गडकरी, निर्मला सीतारामन, अर्जुन राम मेघवाल यांच्यासह अन्य केंद्रीय मंत्री उपस्थित होते. मणिपूर हिंसाचाराच्या मुद्द्यावर संसदेत गदारोळ सुरू असल्यामुळे कामकाजाचा बराचसा वेळ वाया गेल्यामुळे अजूनही बरीच विधेयके व चर्चा प्रलंबित आहेत. अशा स्थितीत अधिवेशन कालावधीतील पुढील नियोजनाबाबत ज्येष्ठ मंत्र्यांसोबत पंतप्रधानांनी स्वतंत्रपणे चर्चा केली.









