मैतेई समुदायाकडून सुरक्षा कर्मचाऱ्यांवर दगडफेक : 17 जखमी
वृत्तसंस्था /इंफाळ
मणिपूरमध्ये अजूनही अधूनमधून हिंसाचाराच्या घटना घडताना दिसत आहेत. नुकताच विष्णुपूर जिल्ह्यात हिंसाचार झाला. कंगवाई आणि फुगचाव भागात गुऊवारी पुन्हा हिंसक संघर्ष उसळला. काही आंदोलक आणि सुरक्षा दलांमध्ये चकमक झाल्याचे सांगण्यात येत आहे. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी लष्कर आणि आरएएफच्या जवानांनी अश्रूधुराच्या नळकांड्या फोडल्या, असे अधिकाऱ्यांनी सांगितले. या संघर्षात 17 आंदोलक जखमी झाले. दरम्यान, जिल्हा प्रशासनाने इंफाळ पूर्व आणि इंफाळ पश्चिममधून संचारबंदीतील शिथिलता मागे घेतली आहे. खबरदारीचा उपाय म्हणून संपूर्ण इंफाळ खोऱ्यात रात्रीच्या संचारबंदीव्यतिरिक्त दिवसाही निर्बंध लादण्यात आले आहेत. एकीकडे मणिपूरमधील हिंसाचार थांबलेला नसतानाच दुसरीकडे, मणिपूर हिंसाचाराच्या मुद्यावरून संसदेत विरोधी पक्षांचा गदारोळ सुरूच आहे. गुऊवारीही विरोधी पक्षांनी संसदेत गोंधळ घालत घोषणाबाजी केली. गदारोळामुळे संसदेचे कामकाज एकवेळा तहकूब करावे लागले.
उच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण आदेश
दुसरीकडे, मणिपूर उच्च न्यायालयाने गुऊवारी एक महत्त्वपूर्ण आदेश दिला. उच्च न्यायालयाने प्रस्तावित जमिनीबाबत यथास्थिती ठेवण्याचे आदेश दिले आहेत. हिंसाचारात मारल्या गेलेल्या कुकी समुदायाच्या सदस्यांचे मृतदेह याच जमिनीवर दफन करण्यात येणार होते. असे केल्याने आधीच अस्थिर असलेली कायदा व सुव्यवस्था आणखी बिघडू शकते, असे उच्च न्यायालयाने म्हटले आहे.









