मालवण : प्रतिनिधी
मालवण तालुका गाबित समाज कार्यकारिणीच्या वतीने आमदार वैभव नाईक यांच्या अभिनंदनाचा ठराव घेण्यात आला. वैभव नाईक यांनी बुधवारी पावसाळी अधिवेशनात गाबित समाजातील लोकांना भेडसावणारा जात पडताळणीबाबतचा प्रश्न उपस्थित करत त्यावर पर्याय काढण्याची जोरदार मागणी केली होती.
मालवण तालुका गाबित समाज कार्यकारिणीची सभा गुरुवारी तालुकाध्यक्ष डॉ. प्रमोद कोळंबकर यांच्या अध्यक्षतेखाली गाबित समाज नागरी सहकारी पतसंस्थेत पार पडली. यावेळी खजिनदार मिथुन मालंडकर, सेजल परब, सदस्य दादा वाघ, गंगाराम आडकर, नरेश हुले, सहदेव साळगावकर, संतोष ढोके, आनंद खडपकर आदी उपस्थित होते. गाबित समाजातील लोकांना पन्नास वर्षांपूर्वीचे कागदोपत्री पुरावे सापडत नसल्याने अशा व्यक्तींकरीता स्थळ पाहणी करून गृह चौकशीचा पर्याय अवलंबिण्यात यावा, अशी मागणी वैभव नाईक यांनी केली होती. मालवण तालुका गाबित समाज कार्यकारिणीच्या वतीने लवकरच वैभव नाईक यांची भेट घेऊन त्यांना अभिनंदन ठराव आणि आभार पत्र दिले जाणार आहे. तसेच पुढील पाठपुराव्याबाबत त्यांच्याशी चर्चा केली जाणार आहे. आजच्या बैठकीत डॉ. कोळंबकर यांनी मोबाईलवरून वैभव नाईक यांच्याशी बातचीत करून त्यांचे आभार व्यक्त केले.