सोन्याचे मंगळसूत्र, नथ आदी दागिने चोरट्यांनी लांबविले
वार्ताहर /किणये
बिजगर्णी गावातील महालक्ष्मी मंदिरात चोरी झाली आहे. मंदिराच्या मुख्य दरवाजाची कढी व गाभाऱ्याच्या दरवाजाचा कुलूप तोडून चोरट्यांनी आत प्रवेश करून देवीच्या गळ्यातील मंगळसूत्र, सोन्याचे व चांदीचे दागिने लांबविले आहे. सदर चोरीचा प्रकार बुधवारी सकाळी उघडकीस आली. ही चोरी मंगळवारी मध्यरात्रीच्या सुमारास झाली असावी, असा संशय गावकऱ्यांनी व्यक्त केला आहे. बिजगर्णी येथील जागृत महालक्ष्मी मंदिरात चोरीचा प्रकार घडला असल्यामुळे गावकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. तसेच हे मंदिर गावच्या मध्यभागी असूनही चोरट्यांनी मंदिर फोडल्यामुळे ग्रामस्थांमध्ये संताप व्यक्त करण्यात येत आहे. नेहमीप्रमाणे मंगळवारी रात्री नऊच्या सुमारास मंदिराच्या गाभाऱ्याला व मुख्य दरवाजाला कुलूप लावण्यात आले होते. बुधवारी सकाळी मंदिराजवळून जाणाऱ्या एका महिलेला मंदिराच्या दरवाजाजवळ मोडून टाकलेला कुलूप निदर्शनास आला. त्या महिलेने ही माहिती रोज मंदिरात येणारे पुजारी अशोक कोळी यांना दिली.
अशोक कोळी हे बुधवारी सकाळी मंदिराकडे आले असता मंदिरात चोरी झाल्याचा प्रकार त्यांच्या निदर्शनास आला. मंदिरात ग्रामस्थ, कमिटीचे चेअरमन वसंत अष्टेकर व गावकरी जमा झाले. त्यांनी लागलीच पोलिसांना याबाबत माहिती दिली. महालक्ष्मी मंदिराच्या मुख्य दरवाजाची कडी तोडून चोरट्यांनी मंदिरात प्रवेश केला व दरवाजाचा कुलूप तोडून गाभाऱ्यात प्रवेश करून देवीच्या मूर्तीवरील एक तोळ्याचे मंगळसूत्र, दीड तोळा पुतळ्या, अर्धा तोळ्याची नथ आदी सोने व चांदीचे साहित्य लांबविले आहे. सुमारे दीड लाखाचा ऐवज चोरट्यांनी लंपास केला असल्याची माहिती गावकऱ्यांनी दिली आहे. वडगाव ग्रामीण पोलीस स्थानकाच्या पीएसआय स्वाती व त्यांचे सहकारी घटनास्थळी दाखल झाले. चोरी झालेल्या मंदिर परिसराची पोलिसांनी पाहणी केली. पोलिसांनी आपल्या सोबत श्वानपथक आणले होते. सदर श्वान मंदिर व मंदिराच्या बाजूला फिरले. त्यापुढे ते घुटमळले. पावसामुळे श्वान बाहेर फिरू शकले नाही, अशी माहिती पोलिसांनी दिली. सदर चोरीच्या प्रकाराबद्दल वसंत अष्टेकर व ग्रामस्थांच्यावतीने वडगाव ग्रामीण पोलिसात माहिती देण्यात आली आहे. अलीकडे ग्रामीण भागात चोऱ्यांचे प्रमाण वाढले आहे. बिजगर्णी गावच्या मध्यभागी असलेल्या महालक्ष्मी मंदिरात चोरी झाली असल्यामुळे आता गावातील नागरिक भयभीत झाले आहेत. तसेच सदर चोरट्यांचा त्वरित बंदोबस्त करण्यात यावा, अशी मागणीही ग्रामस्थांतून होत आहे.









