दोन लाखाचे दागिने लंपास : श्वान पथकाला पाचारण; ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण
वार्ताहर /कंग्राळी खुर्द
पाटील गल्ली (चवकर लाईन) येथील रघुनाथ (बाळु) टोपाण्णा पाटील यांच्या बंद घराचा कडीकोयंडा तोडून चोरट्यांनी 2 लाखांचे दागिने पळविले आहेत. भरदिवसा झालेल्या घरफोडीमुळे कंग्राळी खुर्द ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. कंग्राळी खुर्द परिसरात शेतामध्ये लागवडीचा हंगाम चालू आहे. रघुनाथ आणि त्यांची पत्नी भात लागवडीसाठी शेताकडे गेले होते. योगेश पाटील हा त्यांचा मुलगा 12.20 च्या दरम्यान कॉलेजला गेला होता. जाताना घराला कुलूप लावून नेहमीप्रमाणे घरची चावी बाथरूममध्ये ठेवली होती. तो पुन्हा कॉलेजवरून 12.45 आला. केवळ 25 मिनिटात तो घरी परतला, त्यावेळी कडीकोयंडा फोडल्याचे त्याच्या निदर्शनास आले. तिजोरीतील सामान विस्कटून त्यामधील कानातले झुमके, गंठण, चार जोड पैंजण असा दोन लाखाचा ऐवज लांबविण्यात आला. जाताना दरवाजाला कडी लावून चोरट्यांनी पोबारा केला. चोरट्यांनी तिजोरी फोडून 30 ग्रॅमचे गंठण, 5 ग्रॅमचे झुमके, 5 ग्रॅमची चेन, 5 ग्रॅमचे टॉप्स व 70 ग्रॅम चांदीचे दागिने असा एकूण 45 ग्रॅम सोने व 70 ग्रॅम चांदी पळविली आहे. त्याची किंमत 1 लाख 84 हजार 200 रुपये इतकी होते. या घटनेची खबर एपीएमसी पोलीस स्थानकाला दिली. पीएसआय मंजुनाथ बजंत्री, सीपीआय मंजुनाथ हिरेमठ यांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला. ठसे तज्ञ व श्वानपथकाला पाचारण करण्यात आले होते.
चोरी सीसीटीव्ही फुटेजमध्ये कैद
रघुनाथ पाटील यांच्या घराशेजारील रहिवासी पितांबर कोलकार तर महादेव रोड येथील यमानी पाटील यांच्या कॅमेऱ्यामध्ये दोन युवकांची छबी दिसून येत असून दुरचे चित्रण झाल्याने चेहरा ओळखणे कठीण झाले आहे. पोलीस अधिकारी पुढील तपास करीत आहेत. घटनास्थळी उपाध्यक्ष कलाप्पा पाटील, माजी अध्यक्ष यलाप्पा पाटील आणि प्रशांत पाटील यांनी पाहणी केली.









