करवसुलीच्या नावाखाली लुटण्याचा प्रकार : मनपा आयुक्तांनी लक्ष देण्याची मागणी
बेळगाव : शहरामध्ये रस्त्यावर बसून वस्तू विकणाऱ्या विव्रेत्यांकडून कर आकारला जातो. प्रत्येकांकडून दहा रुपये कर आकारला जात होता. मात्र आता दमदाटी करत तब्बल 50 रुपये द्या, अन्यथा भाजी व इतर साहित्य उचलून घेऊन जावू, असा इशारा दिला जात आहे. यामुळे भाजीविक्रेत्यांतून आणि इतर व्यावसायिकांतून तीव्र संताप व्यक्त करण्यात येत आहे. संबंधित कंत्राटदाराला मनपा आयुक्तांनी योग्य ती सूचना करावी, अशी मागणी व्यावसायिकांतून होत आहे. बुधवारी समादेवी गल्ली परिसरातील भाजीविक्रेते व व्यावसायिकांवर दमदाटी करण्यात आली. पूर्वीपासून दहा रुपयेच हे व्यावसायिक देत आले आहेत. मात्र आता 3 ते 4 जण येऊन यापुढे दररोज 50 रुपये द्या, अन्यथा तुमची सर्व भाजी व साहित्य घेऊन जाऊ, अशी दमदाटी करण्यात आली. यामुळे तीव्र संताप व्यक्त होत आहे. शहरातील भाजीविक्रेते व इतर व्यावसायिकांकडून कर जमा करण्यासाठी महापालिका कंत्राट देत असते. मात्र हे कंत्राटदार पिळवणूक करत आहेत, असा आरोप होत आहे. समादेवी गल्लीतील केळकर बागजवळील मारुती मंदिर परिसरातील भाजीविक्रेत्यांना बुधवारी करवसुली करणाऱ्या तरुणांनी दमदाटी केली आहे. तेव्हा महापालिका आयुक्तांनी गांभीर्याने दखल घेऊन संबंधित कंत्राटदाराला सूचना करावी, अन्यथा तीव्र आंदोलन करू, असा इशारा देण्यात आला आहे.









