अंगणवाडी कर्मचारी संघटनेचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन
बेळगाव : अंगणवाडी कर्मचाऱ्यांना निवडणूक विभागाच्या कामांसाठी जुंपण्यात येत आहे. महिला आणि बाल कल्याण विकास खात्याच्या कामाबरोबर इतर कामांचा होणारा भार कर्मचाऱ्यांसाठी जाचक आहे. निवडणूक विभागाकडून बीएलओ म्हणून केलेली नेमणूक रद्द करण्यात यावी, या मागणीसह इतर विविध मागण्यांच्या पूर्ततेसाठी अंगणवाडी कर्मचारी फेडरेशनकडून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करून निवेदन दिले.
अंगणवाडी कर्मचाऱ्यांना वेगवेगळ्या कामामध्ये गुंतविण्यात येत आहे. त्यामुळे अंगणवाडीच्या विकासाकडे दुर्लक्ष होत आहे. परिणामी अंगणवाडीतील मुलांची संख्या घटत आहे. सरकारकडून वेगवेगळ्या सर्व्हेक्षणासाठी कामाला जुंपण्यात येत आहे. याबदल्यात अत्यल्प मोबदला दिला जात आहे. शिक्षिका अंगणवाडीमध्ये नसल्या कारणाने पालकांतून तक्रार करण्यात येत आहे. यामुळे विद्यार्थ्यांची संख्या घटत आहे. याबरोबरच पाहणीसाठी आलेल्या अधिकाऱ्यांकडून कर्मचाऱ्यांवर दबाव घातला जात आहे. अशा परिस्थितीत अंगणवाडी कर्मचाऱ्यांना काम करावे लागत आहे. निलंबणाच्या कारवाईची भीती दाखवून अधिकारी अंगणवाडी कर्मचाऱ्यांना कामाला जुंपत आहेत. निवडणूक कामासाठी सदर कर्मचाऱ्यांची बीएलओ म्हणून करण्यात आलेली नेमणूक त्वरित रद्द करण्यात यावी. वाढविण्यात आलेल्या कामांचा भार कमी करण्यात यावा. पूर्वी प्रमाणे सुरू असलेली कामे देण्यात यावीत, अन्यथा तीव्र आंदोलन करू, असा इशाराही संघटनेकडून देण्यात आला आहे. गर्भवती महिलांना पौष्टिक आहार देणे, तपासणी करणे, अशा प्रकारची आरोग्य खात्याची कामे देण्यात यावीत. मात्र इतर कामांबद्दल सवलत देण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली आहे.
कर्मचाऱ्यांच्या वेतनातून दिले जाते गॅस बिल अन् भाडे
भाडेतत्त्वावर असणाऱ्या अंगणवाडी केंद्रांचे आठरा महिन्यांपासून भाडे देण्यात आले नाही. एक वर्षांपासून गॅसचे बिल देण्यात आलेले नाही. सदर खर्च अंगणवाडी कर्मचाऱ्यांकडून त्यांच्या वेतनातून देण्यात येत आहे. याबाबत अधिकाऱ्यांना कळवूनही दखल घेण्यात आलेली नाही, असा आरोपही यावेळी करण्यात आला. याकडे अधिकाऱ्यांनी लक्ष द्यावे, अशी मागणी करण्यात आली आहे.
मनपा आयुक्तांविरोधात घोषणा
मनपा आयुक्त अशोक दुडगुंटी यांनी अंगणवाडी कर्मचाऱ्यांना अपशब्द वापरला आहे. याबद्दल मनपा आयुक्तांच्या व्यक्त्यव्याचा निषेध करण्यात आला. कमी पगार घेणाऱ्या अंगणवाडी कर्मचाऱ्यांना अधिकाऱ्यांकडून अशा प्रकारची वागणूक देण्यात येत असल्याबद्दल संताप व्यक्त करण्यात आला.









