दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी : मूकमोर्चाद्वारे जिल्हाधिकाऱ्यांना दिले निवेदन
कारवार : मणिपूरमधील हिंसात्मक घटनांचा निषेध नोंदविण्यासाठी आणि दोषींवर कठोर कारवाई करावी, या मागणीकडे लक्ष वेधण्यासाठी जिल्ह्यातील ख्रिश्चन बांधवांनी सोमवारी येथे मूकमोर्चाचे आयोजन करून कारवार जिल्हाधिकारी गंगुबाई मानकर यांच्याद्वारे राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना निवेदन सादर केले. मोर्चाचे आयोजन कारवार धर्मप्रांत आणि कारवार जिल्ह्यातील विविध ख्रिश्चन संघटनांतर्फे करण्यात आले होते. प्रारंभी येथील मित्र समाज मैदानावर ख्रिस्ती बांधव जमा झाले. त्यानंतर येथील मुख्य रस्त्यावरून मूकमोर्चा काढण्यात आला. मोर्चामध्ये हजारो ख्रिस्ती बांधव सहभागी झाले होते. यामध्ये महिलांचा भरणा अधिक होता. मोर्चात सहभागी झालेल्या ख्रिस्ती बांधवांनी मणिपुरात शांतता नांदली पाहिजे, हिंसाचाराला पूर्ण विराम मिळाला पाहिजे, अन्याय झालेल्या नागरिकांना न्याय मिळाला पाहिजे. दोषींवर कठोर कारवाई झाली पाहिजे. अशा आशयाचे फलक हाती घेतले होते. त्यानंतर मूकमोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर नेण्यात आला. मान्यवरांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. पुढे जिल्हाधिकारी यांच्याद्वारे राष्ट्रपतींना निवेदन देण्यात आले.
निवेदनात असे म्हणण्यात आले आहे की, मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यापासून मणिपुरात हिंसाचार सुरू आहे. हिंसाचारामुळे आदिवासी समाजाची विशेष करून महिलांची प्रचंड हानी झाली आहे. लज्जास्पद घटना घडल्या आहेत. एकूण 121 लोकांचा बळी गेला आहे. 197 गावाची जाळपोळ करण्यात आली असून सात हजाराहून अधिक घरे जाळण्यात आली आहे. 359 प्रार्थना मंदिरे जाळण्यात आली आहेत. 41 हजार 425 नागरिक विस्थापित झाले आहेत. तरी मणिपूरमध्ये शांतता नांदण्याची कोणतीच लक्षणे दिसून येत नाहीत. म्हणून आता राष्ट्रपती महोदयानी केंद्र आणि राज्य सरकारला सूचना करण्याची वेळ येऊन ठेपली आहे. या घटनांची चौकशी करून दोषींवर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे. यावेळी डॉ. डेरेक फर्नांडीस, फादर वलेरीयन सिक्वेरा सायमन टेलीस, फादर साल्वादारे रॉड्रीग्ज, एसीस गोन्साल्वीस, सॅमसन जॉन डिसोजा, सिस्टर मेरी अलफोन्झा, फ्रॅकी गुडीन्हो, रॉयस्टोन गोन्साल्वीस, मेबल पिंटो, लोओ लेसीस, जॉर्ज फर्नांडीस आदी उपस्थित होते.









