1 ऑक्टोबरपासून लागू होण्याची शक्यता : 6 महिन्यांनी होणार आढावा बैठक
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
वस्तू आणि सेवा कर म्हणजेच जीएसटी परिषदेच्या 51 व्या बैठकीत बुधवारी केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी ऑनलाईन गेमिंग, हॉर्स रेसिंग आणि कॅसिनोवर 28 टक्के कर लावण्याचा निर्णय कायम ठेवला आहे. याकरता जीएसटी अधिनियमात संसदेच्या पावसाळी अधिवेशनात दुरुस्ती केली जाईल. हा अधिनियम 1 ऑक्टोबरपासून लागू होऊ शकतो असे सीतारामन यांनी म्हटले आहे.
28 टक्के जीएसटी अधिनियम लागू झाल्यावर 6 महिन्यांनी याची समीक्षा केली जाईल. हा निर्णय सामूहिक चर्चेनंतर घेण्यात आल्याचे अर्थमंत्र्यांनी सांगितले आहे. ऑनलाईन गेमिंगवर 28 टक्के कराच्या प्रस्तावावर पुनर्विचार व्हावा अशी इच्छा गोवा आणि सिक्कीम या राज्यांनी व्यक्त केली होती. ऑनलाईन गेमिंगवर 28 टक्के कराचा उपयोग काय? कारण तामिळनाडूत अशाप्रकारच्या सर्व गेम्सवर बंदी असल्याचे तामिळनाडूच्या प्रतिनिधीने म्हटले होते. तर पश्चिम बंगाल, बिहार, छत्तीसगड, उत्तरप्रदेश, हिमाचल प्रदेश, महाराष्ट्र आणि गुजरातने लवकरात लवकर 28 टक्के जीएसटी आकारण्याची मागणी केली असल्याची माहिती अर्थमंत्र्यांनी दिली आहे.
जीएसटी परिषदेच्या 50 व्या बैठकीत ऑनलाईन गेमिंग, हॉर्स रेसिंग आणि कॅसिनोवर 28 टक्के कर आकारण्याचा निर्णय घेण्यात आला होता. यावर आतापर्यंत 18 टक्के कर आकारण्यात येत होता.









