रत्नागिरी : प्रतिनिधी
कोकणाला गेल्या काही दिवसांपासून मुसळधार पावसाने अक्षरश: झोडपून काढले. २ ते ३ वेळेला जिल्ह्याला पावसाचा रेड अलर्ट देण्यात आला होता. तर बहुतांश दिवशी पावसाचा ऑरेंज अलर्ट देण्यात आला होता. या सोबतच जिल्ह्यातील शेतकरी दिनदर्शिकेत आधी नक्षत्र बदल कधी होतोय व नक्षत्राला कोणते वाहन लागते आहे, हे पाहतो. येत्या ३ ऑगस्टला नक्षत्र बदल होत असून वाहन म्हैस आहे. या आधी बेडूक वाहन होते. त्यामुळे आधी बेडकाने जिल्ह्यात बऱ्याच अंशी पूरस्थिती निर्माण केली होती. मात्र म्हशीला सूर गवसणार का? हे पाहणे गरजेचे आहे.
हवामान व शेती यांचे अनन्यसाधारण असे समीकरण आहे. हवामानाच्या बदलावर शेतीचे गणित व देशाचे अर्थकारण अवलंबून असते. एकीकडे शेतकरी पारंपरिक मूल्ये जपत शेती करताना सोबत आधुनिकतेची जोडही देत आहे. हवामान विभागाच्यावतीने पर्जन्यमानाचा अंदाज वर्तवण्यात येत असतो. या सोबतच शेतकरी नक्षत्र व त्यांचे वाहन पाहत असतो. सहसा जून महिन्यातील पहिल्या आठवड्यात मृग नक्षत्र लागते आणि त्याचे वाहन या आधी बऱ्याच अंशी हत्ती, बेडूक, म्हैस यापैकी असते. यंदा हे वाहन हत्ती होते. मात्र अख्खे नक्षत्रच कोरडे गेले.. यामुळे शेतीची कामे खोळंबली, शिवाय पावसाच्या वाटेकडे बळीराजाचे डोळे लागले. जून महिन्याच्या शेवटी पाऊस सक्रिय झाला. जुलै महिना येताच पावसाने आहे त्याहून जोर पकडला. त्यामुळे जिल्ह्यात पावसाने दाणादाण उडवली. चिपळूण, खेड, राजापूर तालुक्यात पूरपरिस्थितीही निर्माण झाली होती. आता आश्लेषा नक्षत्र लागणार असून म्हैस वाहन असल्याने जिल्ह्यात आता पाऊस कितपत बरसतो, हे आगामी दिवसात स्पष्ट होणार आहे.
पावसाचा जोर वाढण्याची शक्यता
३ ऑगस्टपासून पुढील केवळ २ ते ३ दिवस पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे. यानंतर हवामानाच्या स्थितीवर पर्जन्यमान अवलंबून असणार आहे असे भारतीय हवामान विभाग, मुंबईच्या सुषमा नायर यांनी सांगितले.