जिल्हाधिकाऱ्यांची माहिती : पूर्वतयारी बैठकीत अधिकाऱ्यांना सूचना
बेळगाव : प्रतिवर्षाप्रमाणे यंदाही 15 ऑगस्ट रोजी स्वातंत्र्यदिन जिल्हा क्रीडांगणावर साजरा करण्यात येणार आहे. यासाठी आवश्यक ती तयारी करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी नितेश पाटील यांनी दिली. जिल्हा पंचायत कार्यालयामध्ये स्वातंत्र्यदिन पूर्वतयारी बैठकीत अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते. जिल्हा पालकमंत्री सतीश जारकीहोळी यांच्या हस्ते सकाळी 9 वाजता ध्वजारोहण करून भाषण करतील. याबरोबरच सालाबादप्रमाणे सर्व धार्मिकस्थळांवर विशेष पूजा करण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
क्रीडांगणावर होणाऱ्या स्वातंत्र्यदिन कार्यक्रमात स्वातंत्र्यसैनिक, लोकप्रतिनिधी, मान्यवर व नागरिक उपस्थित राहणार आहेत. त्यांच्यासाठी आसन व्यवस्था करण्यात येणार आहे. सर्व सरकारी कार्यालयांवर विद्युत रोषणाई करण्याच्या सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी केली. सर्व सरकारी खात्यांच्या अधिकाऱ्यांनी आपल्या कार्यालयांवर ध्वजारोहण करून जिल्हा क्रीडांगणावर होणाऱ्या कार्यक्रमात सहभागी व्हावे, असे आवाहनही त्यांनी केले. नागरिकांनीही आपल्या व्यापारी आस्थापनांवर विद्युत रोषणाई करून स्वातंत्रोत्सव उत्साहाने साजरा करावा, असे आवाहन केले. या कार्यक्रमामध्ये शालेय विद्यार्थी, महिला अधिक संख्येने सहभागी होण्यासाठी बस व्यवस्था उपलब्ध करण्याची सूचना परिवहन खात्याच्या अधिकाऱ्यांना केली. पोलीस खात्याने परेडची तयारी करावी. सांस्कृतिक कार्यक्रम सादर करणाऱ्या पथकांना प्रशिक्षण देऊन सज्ज ठेवण्याची सूचना अधिकाऱ्यांना केली. याबरोबरच सायंकाळी कुमार गंधर्व रंगमंदिरामध्ये सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन केल्याचे त्यांनी सांगितले. या समारंभादरम्यान आवश्यक वैद्यकीय सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी आरोग्य खात्याच्या अधिकाऱ्यांना सूचित करण्यात आले.
प्लास्टिक ध्वजावर निर्बंध
प्लास्टिक ध्वजावर निर्बंध घालण्यात आले आहेत. यामुळे सर्वांनी खादी ध्वजच वापरावेत. याबरोबरच सुशोभिकरणासाठी प्लास्टिकचे ध्वज वापरण्यात येवू नयेत. कागदाचे अथवा कापडी ध्वज वापरावेत, असा आदेश जिल्हाधिकारी नितेश पाटील यांनी दिला आहे. या बैठकीमध्ये जिल्हा पंचायतचे मुख्य कार्यकारी अधिकारी हर्षल भोयर, निवासी जिल्हाधिकारी विजयकुमार होनकेरी, मनपा आयुक्त अशोक दुडगुंटी व स्वातंत्र्यसैनिक उपस्थित होते.









