बेळगावमध्ये 127 ट्रान्सफॉर्मर निकामी : कारवार परिसरात हेस्कॉमला सर्वाधिक फटका
बेळगाव : मागील काही दिवसांत बेळगावसह उत्तर कर्नाटकात झालेल्या धुवांधार पावसामुळे हेस्कॉमचे मोठे नुकसान झाले. विद्युतवाहिन्या, खांब व ट्रान्सफॉर्मरचे मिळून 21 कोटी 67 लाखाचे नुकसान झाल्याची नेंद झाली आहे. ज्याठिकाणी विद्युतवाहिन्या कोसळल्या होत्या, त्याठिकाणचा वीजपुरवठा तातडीने पूर्ववत करण्यात आला आहे. हेस्कॉमच्या कार्यक्षेत्रात बेळगाव जिल्ह्यासह धारवाड, गदग, उत्तर कन्नड, बागलकोट, विजापूर व हावेरी जिल्ह्यांचा समावेश आहे. एप्रिल महिन्यापासून जोरदार वादळी वाऱ्यासह पावसाला सुरुवात झाली होती. मध्यंतरी विश्रांती घेतलेल्या पावसाने जुलैअखेरीला जोरदार हजेरी लावली. यामुळे वीजखांब व विद्युतवाहिन्यांचे नुकसान झाले. विशेषत: उत्तर कन्नड जिल्ह्यातील कारवार परिसरात हेस्कॉमचे सर्वाधिक नुकसान झाले.
खानापूर तालुक्यालाही पावसाचा सर्वाधिक फटका
हेस्कॉमच्या एकूण 10 हजार 507 वीजखांबांचे नुकसान झाले. 1 हजार 130 ट्रान्सफॉर्मर निकामी झाले. बेळगाव जिल्ह्यामध्ये 127 ट्रान्सफॉर्मर निकामी झाले तर दोन किलोमीटर लांबीच्या विद्युतवाहिनीचे नुकसान झाले आहे. ग्रामीण भागात वीजपुरवठा खंडित झाला होता. खानापूर तालुक्याला पावसाचा सर्वाधिक फटका बसला.
दुरुस्तीचे काम 95 टक्के पूर्ण
एप्रिल ते जुलै या कालावधीत वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसामुळे विद्युतखांब कोसळले तर ट्रान्सफॉर्मर निकामी झाले आहेत. जुलै अखेरीला झालेल्या पावसामुळे बरेच नुकसान झाले. 95 टक्के दुरुस्तीचे काम पूर्ण झाले असून उर्वरित काम येत्या दोन दिवसांत पूर्ण केले जाणार आहे.
– मोहम्मद रोशन (हेस्कॉमचे व्यवस्थापकीय संचालक)









