पुणे / प्रतिनिधी :
उत्तरपूर्व बंगालच्या उपसागरात बांग्लादेशच्या किनारपट्टीलगत न्यून दाबाचे क्षेत्र तयार झाले असून, या क्षेत्राच्या प्रभावामुळे महाराष्ट्रासह देशाच्या अनेक भागांत जोरदार पाऊस होत आहे. महाराष्ट्रात पुढील दोन दिवस कोकण तसेच मध्य महाराष्ट्रातील काही जिल्हय़ांत मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा ऑरेंज अलर्ट, तर अनेक जिल्हय़ांना वादळी पावसाचा ‘यलो अलर्ट’ देण्यात आला आहे.
उत्तरपूर्व बंगालच्या उपसागरात न्यून दाबाचे क्षेत्र निर्माण झाले असून, हे क्षेत्र मंगळवारी सायंकाळी बांग्लादेशमधील खेपुपारा ते दीघा दरम्यान किनारपट्टी पार करेल. यामुळे या भागात अलर्ट देण्यात आला आहे. यानंतर पुढील 24 तासांत हे क्षेत्र उत्तरपश्चिमेच्या दिशेने प्रवास करीत, पश्चिम बंगालच्या दिशेने वळेल. याच्या प्रभावामुळे झारखंड, छत्तीसगड, बिहार राज्यांत अतिवृष्टी ते अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. मंगळवारी याच्या प्रभावामुळे ओरिसा ते पश्चिम बंगालच्या भागात अतिवृष्टीची नोंद झाली, याशिवाय किनारी भागात जोरदार वारे वाहत आहेत. बुधवारी हवामान विभागाने ओरिसाला ‘रेड अलर्ट’ दिला असून, पश्चिम बंगाल, बिहार, झारखंड, उत्तरप्रदेश, मध्य प्रदेश, छत्तीसगड, उत्तराखंड राज्यात दोन दिवस ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे.
महाराष्ट्रात पाऊस
बंगालच्या उपसागरातील न्यून दाबाचे क्षेत्र तसेच अरबी समुद्रावरुन वाहणाऱ्या पश्चिमी वाऱ्यांना बळकटी मिळाल्याने राज्यात पुन्हा पावसाचा जोर वाढला आहे. यात मंगळवारी रत्नागिरी तसेच साताऱ्यातील घाट क्षेत्रात मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस नोंदविण्यात आला. पुढील दोन दिवस कोकण तसेच मध्य महाराष्ट्रातील काही भागांत ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. तो पुढीलप्रमाणे, याबरोबरच राज्याच्या अनेक भागांत वादळी पावसाचा यलो अलर्टही हवामान विभागाने दिला आहे.
बुधवार ऑरेंज अलर्ट
रायगड, रत्नागिरी, पुणे, सातारा
गुरुवार ऑरेंज अलर्ट
पालघर, ठाणे, मुंबई, रायगड, रत्नागिरी, पुणे, सातारा.








