व्हीलचेअरयुक्त इलेक्ट्रिक वाहनाची सोय : अवघ्या चार दिवसात उभारला रॅम्प
पणजी : विधानसभा अधिवेशनाचे कामकाज सर्वांना पहायला मिळावे या हेतूने आता दिव्यांगजनांसाठीही विधानसभा प्रवेश सुलभ करण्यात आला आहे. काल मंगळवारी विधानसभा संकुलामध्ये प्रवेश करण्यासाठी व्हीलचेअरयुक्त इलेक्ट्रिक वाहनातून काही दिव्यांगांनी प्रेक्षक कक्षामध्ये प्रवेश केला. हल्लीच गोवा राज्य विधानसभा संकुलामध्ये विद्यार्थ्यांना उचलून प्रेक्षक कक्षामध्ये आणावे लागत असल्याबाबतची बातमी प्रसिद्ध केली होती. या वृत्ताची गंभीर दखल घेत राज्य दिव्यांगजन आयुक्त कार्यालयाने सदर संकुल दिव्यांगजनांसाठी प्रवेश सुलभ बनवण्यासाठी आवश्यक उपाययोजना राबवण्याबाबत पाठपुरावा केला. त्यामुळे काल मंगळवारी काही दिव्यांगजन सुलभपणे विधानसभेच्या प्रेक्षककक्षामध्ये दाखल होऊ शकले. दिव्यांगजनांनाही विधानसभेचे कामकाज कशा प्रकारे चालते याचा प्रत्यक्ष अनुभव मिळावा, या उद्देशाने केवळ चार दिवसांच्या कालावधीतच येथे रॅम्प सुविधा करण्यात आली. दिव्यांगजनांसाठी प्रवेशसुलभ विधानसभा संकुल बनवणाऱ्या मोजक्याच राज्यांमध्ये आता गोवा राज्याचाही समावेश झाला आहे.
विधानसभा प्रत्येकाला सोयीस्कर व्हावी : तवडकर
याबाबत सभापती रमेश तवडकर म्हणाले की, विधानसभा हे लोकशाहीचे मंदिर आहे. प्रत्येक नागरिकाला येथे सोयीस्कर वाटले पाहिजे आणि कामकाज छानपणे बघता आले पाहिजे. हा मुद्दा समोर आल्यानंतर आम्ही त्याची सकारात्मकपणे दखल घेतली. समाजकल्याणमंत्री सुभाष फळदेसाई आणि राज्य दिव्यांगजन आयुक्त गुऊप्रसाद पावसकर यांच्या प्रयत्नांतून आता दिव्यांगजनांनाही विधानसभेचे कामकाज सुलभपणे पाहण्याची संधी मिळणार आहे. समाजातील कोणत्याही घटकातील व्यक्तीला वगळले जाऊ नये, हेच सरकारचे धोरण आहे, असेही सभापती म्हणाले. समाजकल्याणमंत्री फळदेसाई यांनी विधानसभा संकुलात सुलभता निर्माण करण्यासाठी त्वरित कार्यवाही केल्याबद्दल राज्य दिव्यांगजन आयुक्त गुऊप्रसाद पावसकर आणि त्यांच्या अधिकारीवर्गाचे अभिनंदन केले. तत्पूर्वी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी विधानसभा संकुलात दाखल होताच दिव्यांगजनांसमवेत संवाद साधला.