नूंहमध्ये संचारबंदी : 6 जिल्ह्यांमध्ये कलम 144 लागू : इंटरनेट सेवा बंद : उत्तरप्रदेश-राजस्थानातही अलर्ट
वृत्तसंस्था/ नूंह
हरियाणातील नूंहमध्ये विश्व हिंदू परिषदेच्या ब्रज मंडल यात्रेदरम्यान झालेल्या हिंसेनंतर तणावाची स्थिती आहे. नूंहमध्ये दोन दिवसांसाठी संचारबंदी लागू करण्यात आली असून स्थितीवर नियंत्रण मिळविण्यासाठी पूर्ण भागात निमलष्करी दलाच्या 13 तुकड्या तैनात करण्यात आल्या आहेत. ही हिंसा आता नूंह (मेवात)नंतर आता गुरुग्रामपर्यंत फैलावली आहे. यामुळे या दोन जिल्ह्यांसोबत खबरदारीदाखल रेवाडी, पलवल, फरीदाबाद आणि सोनीपत समवेत 6 जिल्ह्यांमध्ये कलम 144 लागू करण्यात आले आहे.
नूंहमध्ये 2 ऑगस्टपर्यंत इंटरनेट सेवा रोखण्यात आली आहे. नूंह, फरीदाबाद, गुरुग्राम आणि पलवलमध्ये मंगळवारी सर्व शैक्षणिक संस्था आणि कोचिंग सेंटर बंद ठेवण्यात आले. तसेच 10 वी आणि 12 वीच्या परीक्षा स्थगित करण्यात आल्या आहेत. हिंसेच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री मनोहरलाल खट्टर यांनी गृहमंत्री अनिल विज यांच्यासह मुख्य सचिव, पोलीस महासंचालक तसेच वरिष्ठ प्रशासकीय अधिकाऱ्यांसोबत उच्चस्तरीय बैठक घेत चर्चा केली आहे.
नूंहमध्ये सोमवारी विश्व हिंदू परिषदेच्या ब्रज मंडल यात्रेवर एका समुदायाच्या लोकांनी दगडफेक केली होती. यामुळे तेथे हिंसा भडकली. दोन्ही समुदायांकडून परस्परांवर दगडफेक तसेच गोळीबार करण्यात आला आहे. या हिंसेत होमगार्ड नीरज अन् गुरसेवक समवेत आतापर्यंत 5 जणांचा मृत्यू झाला आहे. तर 50 हून अधिक पोलीस अधिकारी, कर्मचारी जखमी झाले आहेत.
हरियाणाच्या हिंसेचा प्रभाव शेजारी राज्यांमध्येही दिसून येत आहे. राजस्थानच्या भरतपूरमध्ये अलर्ट जारी करण्यात आला आहे तसेच येथील 4 भागांमध्ये इंटरनेट सेवा बंद करण्यात आली आहे. उत्तरप्रदेशात हरियाणाला लागून असलेल्या सीमेवर विशेष बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. मेरठ, अलीगढ, मुजफ्फरनगर समवेत हरियाणाला लागून असलेल्या उत्तरप्रदेशच्या जिल्ह्यांमध्येही अलर्ट जारी करण्यात आला आहे.
शेकडो वाहनांना जाळले
नूंहमध्ये समाजकंटकांनी रस्त्यांवर तीन किलोमीटरच्या कक्षेत दिसून आलेल्या सर्व वाहनांना पेटवून दिले आहे. यानंतर 500 हून अधिक जणांच्या जमावाने सायबर पोलीस स्थानकात तोडफोड केली आहे. तेथे पोलिसांच्या वाहनांना त्यांनी आगीच्या हवाली केले. याचबरोबर परिसरातील दुकानांमध्ये समाजकंटकांनी लूट केली आहे. एका दुचाकी शोरूममधून 200 बाइक्स चोरण्यात आल्या आहेत.
अतिरिक्त पोलीस दल तैनात
हिंसेप्रकरणी पोलिसांनी आतापर्यंत 20 एफआयआर नोंदविले आहेत. नूंहमध्ये रेवाडी, गुरुग्राम, पलवलपासून अतिरिक्त पोलीस दल पाठविण्यात आले आहे. पूर्ण राज्यात अलर्ट जारी करण्यात आला असून केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी याप्रकरणी अहवाल मागविला आहे. राज्याचे पोलीस महासंचालक पी.के. अग्रवाल आणि सीआयडी प्रमुख आलोक मित्तल हे नूंहसाठी रवाना झाले आहेत. शांतता प्रस्थापित केल्यावर स्थितीचा आढावा घेतला जाणार आहे. याप्रकरणी चौकशी करण्यात येणार असल्याचे वक्तव्य गृहमंत्री अनिल विज यांनी केले आहे. नूंहची घटना दुर्दैवी आहे. राज्यात शांतता राखण्याचे आवाहन सर्व लोकांना करू इच्छितो. दोषींना सोडले जाणार नाही. कठोरातील कठोर कारवाई केली जाणार असल्याचे मुख्यमंत्री मनोहरलाल खट्टर यांनी म्हटले आहे.









