एप्रिल ते जून तिमाहीमधील आकडेवारीचा समावेश
वृत्तसंस्था/ मुंबई
वाहन निर्मितीमधील दिग्गज कंपनी मारुती सुझुकी इंडियाचा निव्वळ नफा एप्रिल-जून तिमाहीत वर्षभरात दुपटीने वाढून 2,485 कोटी रुपयांवर पोहोचला आहे. वर्षभरापूर्वी ते 1013 कोटी रुपये होते. जून तिमाहीत ऑपरेटिंग उत्पन्नही वाढून 32,327 कोटी रुपये झाले, जे मागील वर्षीच्या याच कालावधीत 26,500 कोटी रुपये होते.
या कालावधीत कंपनीच्या महसुलात 22 टक्क्यांनी वाढ झाली आहे. सोमवारी मारुती सुझुकीचा शेअर 1.6 टक्के वाढून 9,821 रुपयांवर बंद झाला. कंपनीच्या संचालक मंडळाने सोमवारी झालेल्या बैठकीत सुझुकी मोटर गुजरात प्रायव्हेट लिमिटेडसोबतचा मॅन्युफॅक्चरिंग करार संपुष्टात आणण्याच्या आणि सुझुकी मोटर कॉर्पोरेशनकडून सुझुकी मोटर गुजरात प्रायव्हेट लिमिटेडचे शेअर्स घेण्याच्या प्रस्तावाला मंजुरी दिली.
अदानी ग्रीन एनर्जीच्या निव्वळ नफ्यात 51 टक्के वाढ
अदानी ग्रीन एनर्जीने सोमवारी पहिल्या तिमाहीचे निकाल जाहीर केले. एप्रिल-जून तिमाहीत, कंपनीने वार्षिक 51 टक्क्यांसोबत 323 कोटी रुपयांचा निव्वळ नफा नोंदवला आहे. मागील वर्षी याच कालावधीत कंपनीला 214 कोटी रुपयांचा नफा झाला होता. या तिमाहीत कंपनीचा एकत्रित महसूल मागील आर्थिक वर्षाच्या याच कालावधीतील 1,635 कोटींच्या तुलनेत 33 टक्क्यांनी वाढून 2,176 कोटी रुपये झाला आहे.









