गेल्या 15 दिवसांपासून रोज लाखांहून अधिक क्युसेक पाण्याची आवक : 83 टक्के पाणीसाठा
वार्ताहर /जमखंडी
पाणलोट क्षेत्रातील पावसाच्या पाण्यावर अवलंबून असलेल्या आलमट्टी धरणाने शंभर टीएमसीचा टप्पा सोमवारी पार केला आहे. गेल्या 15 दिवसांपासून लाखांहून अधिक क्युसेक पाण्याची आवक होत असल्याने याचा पुरेपूर लाभ आलमट्टी धरण भरण्यास झाला आहे. सध्या धरणात 83 टक्के पाणीसाठा असून येत्या काही दिवसांत धरण पूर्ण क्षमतेने भरेल इतके पाणी अद्यापही आलमट्टी धरणात येत आहे. तर पाणलोट क्षेत्रातून येणाऱ्या पाण्याचा विसर्ग कमी झाल्याने नद्यांच्या पाणीपातळी ओसरू लागली आहे. आलमट्टी धरणाची पाणीपातळी 528.31 मीटर असून 1 लाख 36 हजार 986 क्युसेक पाण्याची आवक होत असून 57 हजार क्युसेकने विसर्ग सुरू आहे. धरणातील पाणीसाठा पाहता कोयना 69 टक्के, धोम 77 टक्के, कण्हेर 65 टक्के, वारणा 84 टक्के, काळम्मावाडी 68 टक्के, राधानगरी 99 टक्के तर पाटगाव धरण 82 टक्के भरले आहे. दरम्यान पाणलोट क्षेत्रासह कृष्णा, वेदगंगा आणि दूधगंगा नदीकाठावरही पावसाने विश्रांती घेतली आहे. कृष्णा नदीवरील कुडची पूल वाहतुकीस खुला झाल्याने वळसा घालून करावा लागणारा प्रवास थांबल्याने प्रवाशी वर्गातून समाधान व्यक्त करण्यात येत आहे.